यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रातर्फे कृतज्ञता पुरस्कार प्रदान
नवी मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्राच्या विद्यमाने शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी नेरुळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार सेवाभावी संस्था आणि १३ गुणवंत व्यक्तींचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी नवी मुंबईतील सुप्रसिद्ध सुलेखनकार, नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले अच्युत पालव यांचाही सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड सचिव डॉ. अशोक पाटील, कोषाध्यक्ष भाऊसाहेब शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना अच्युत पालव म्हणाले की मागीलवर्षी संस्थेने मला कृतज्ञता पुरस्कार - २०२४ प्रदान केला होता. यशवंतराव चव्हाण यांची मुद्रा असलेला हा पुरस्कार मला पद्मश्री किताबा इतकाच मोलाचा आहे. असे सांगून संस्थेचा कार्याचा गौरव करुन ते म्हणाले की सुलेखनाच्या एखाद्या कार्यशाळेसाठी संस्थेने प्राचारण केल्यास मी नक्की येईन.
प्रमोद कर्नाड यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आता यशवंतराव चव्हाण सेंटर असे नामकरण झाल्याचे नमूद करुन कै. यशवंतराव चव्हाण यांच्या काही आठवणी जागवून प्रतिष्ठानच्या कार्याची सखोलपणे माहिती दिली.
दीप प्रज्वलन करुन आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सुरू झालेल्या या कार्यक्रमात तरुण कृष्णा - देवा या युवा संगीतकारांनी गाण्याची मैफिल चांगली रंगवली व रसिकांची मने जिंकून घेतली.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यात अनाथ व आदिवासी मुलांच्या सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट, दिव्यांग व अपंगांच्या सेवेप्रित्यर्थ संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट, शिक्षण प्रसारासाठी पुणे वसतीगृह संचलित पुणे विद्यार्थी गृह आणि आरोग्य सेवेसाठी आदित्य हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी यांस अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय गुणवंत व्यक्ती म्हणून सुभाष कुलकर्णी (संस्कृतीक), प्रा. एल. बी. पाटील (साहित्य), डॉ. प्रा. बळीराम गायकवाड (शिक्षण), नारायण जाधव (पत्रकारिता), सर्जेराव कुईगडे (वाचक चळवळ), शंकर सोनवणे (चित्रकला), सुरेश पोटे (ज्येष्ठ नागरिक सेवा), मारुती नाना कदम (पर्यावरण), महेंद्र शिवशरण (कला), कु. प्रकाशिका नाईक (क्रीडा), सौ. मनीषा वळकुंडे (व्यसनमुक्ती), कृष्णा - देवा (संगीत) आणि महेंद्र कोंडे (प्रशासन).
पल्लवी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अशोक पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.