नमुंमपा आयुक्तांनी जाणल्या उद्योजक, व्यावसायिकांच्या अडचणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्योग आणि व्यवसायास चालना देण्यासाठी उद्योजक तसेच व्यावसायिक यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आयुक्त डॉ. शिंदे यांनी उपस्थित उद्योजक आणि व्यावसायिक यांच्याशी संवाद साधत त्यांना प्रशासकीय पातळीवर जाणवणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यामधील तातडीने करावयाच्या बाबींवर पूर्तता करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. याप्रसंगी महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा. संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण उपस्थित होते.
या बैठकीमध्ये एमआयडीसी, एपीएमसी मार्केट यांचे उच्च अधिकारी तसेच ठाणे-बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, क्रेडाई-एमसीएचआय नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशन, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशम, होलसेलर्स असोसिएशन, नवी मुंबई व्यापारी असोसिएशन यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व संस्था प्रतिनिधींनी मनोगतातून व्यक्त केलेल्या अडी-अडचणी, सूचना जाणून घेतल्यानंतर आयुवत डॉ. शिंदे यांनी त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित महापालिका विभागांना दिले. महापालिका क्षेत्रात उद्योग, व्यवसाय करणाऱ्या घटकांमुळे शहराचे महत्व वाढते असे स्पष्ट करीत या घटकांशी नियमित संवाद रहावा यादृष्टीने अशा प्रकारच्या बैठका यापुढील काळात नियमित आयोजन करण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले.
पुनर्विकासांतर्गत होणाऱ्या बांधकामांमुळे शहराची लोकसंख्येत आगामी काळात पडणारी लक्षणीय भर बघता शहराला भविष्यात पाण्याची गरज भासणार आहे. सदर बाब लक्षात घेऊन बांधकामे करताना ‘नमंुमपा'च्या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांतील शुध्दीकरण केलेल्या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर बांधकामासाठी आणि पिण्याव्यतिरिक्त इतर बाबींसाठी करावा. पिण्याच्या पाण्याची बचत करावी, असे आयुक्त डॉ. .कैलास शिंदे यांनी पुन्हा एकवार सर्वांना सांगितले.
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण मधील महत्वाचा भाग असलेल्या नागरिकांचा प्रतिसाद अर्थात सिटीझन फिडबॅक नोंदविण्यास ‘स्वच्छ भारत मिशन'मार्फत सुरुवात झाली आहे. https://sbmurban.org/feedback या लिंकवर क्लिक करुन नागरिक शहर स्वच्छतेविषयीचा आपला अभिप्राय ॲपवर नोंदवू शकतात. त्यानुसार प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या मोबाईलवरुन शहराच्या सर्वोत्तम मानांकनासाठी सर्वेक्षणात विचारल्या जाणाऱ्या १० प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत सदर बैठकीत माहिती देण्यात आली आणि अभिप्राय नोंदवून प्रात्यक्षिक करण्यात आले. अशाप्रकारे प्रत्येकाने आपले कुटुंबिय, मित्र-परिवार, कार्यालयीन सहकारी यांनाही अभिप्राय नोंदविण्यास प्रोत्साहित करावे, असे यावेळी सूचित करण्यात आले.
उद्योग, बांधकामे आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या, प्रमाणपत्रे जलद आणि सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन कार्यपध्दतीचा अंगिकार करुन कार्यप्रणालीत सुधारणा आणि गतीमानता आणण्याच्या दृष्टीने एक खिडकी संकल्पना नुसार कार्यवाही सुरु आहे. काही गोष्टी सामाजिक जबाबदारी म्हणून करणे गरजेचे असते, याची आयुक्तांनी जाणीव करुन दिली. मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतील क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांच्या कृती आराखड्यामधील सात कलमांमध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन देखील एक महत्वाचे कलम असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना सदर बैठक महत्वाची होती.
-डॉ. .कैलास शिंदे, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.