घाणीच्या साम्राज्यात ३ हजार नागरिकांची वस्ती
भाईंदर : नव्याने तयार केलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता उंच झाल्याने रस्त्याजवळील चाळी रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली गेल्याने तेथील पायवाट, नाला, गटाराची पातळी सुध्दा खाली गेली आहे. त्यामुळे त्याठिकाणी महापालिका सफाई कर्मचारी पोहचू शकत नसल्याने मिरा रोड येथील मुंशी कंपाऊंड परिसरातील ३०० कुटुंबांना घाणीच्या साम्राज्यात रहावे लागत आहे. घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने रोगराई वाढली असून ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना जीव धोक्यात टाकून जावे लागत आहे.
मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मिरा गांवाजवळ असलेल्या मुंशी कंपाऊंड येथे जयंतीलाल आणि ठाकरे चाळ अशा २ चाळी गेल्या ५० वर्षाहून अधिक काळापासून आहेत. यात ३०० खोल्या असून त्यात साधारण २५०० नागरिक राहत आहेत. सदर भागात ‘एमएमआरडीए'ने सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला. ७ मीटर रस्त्याचे १२ मीटर असे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, सदर रस्त्याजवळील चाळीच्या पातळीपेक्षा ३ फुट उंच झाल्याने तेथील पायवाट, नाला, गटाराची पातळी खाली गेली. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात पाणी भरले जाते आणि प्रत्येकाच्या घरात सुमारे ४ फुट पाणी भरते. तसेच नाला, गटाराची पातळी रस्त्याच्या खाली गेल्याने गटारे तुडूंब भरुन वाहत असतात. रस्त्याच्या खोल खाली गटार असल्याने सफाई कर्मचारी पोहचू शकत नाहीत. प्रचंड दुर्गंधी पसरल्याने रोगराई वाढली असून लहान मुलांना त्याची तीव्रता अधिक वाढली आहे.
गेल्या ४ वर्षांपासून या भागातील माजी नगरसेविका वीणा भोईर यांनी सातत्याने महापालिकेकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. आता प्रशासकीय राजवट सुरु असताना अनेक प्रयत्न केले. तरीसुद्धा यावर तोडगा किंवा आवश्यक ते काम झालेले नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. आता येथील स्थानिक रहिवासी अमर म्हस्के यांनी रहिवाशांच्या सहीचे निवेदन दिले आहे. माजी नगरसेविका वीणा भोईर यांनी सदर समस्येचे निराकरण करण्याची मागणी आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, याबाबत महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी सक्शन पंप लाऊन गटार साफ करण्यात येतील. तसेच १४० मीटरचे नवीन गटार बांधण्याचा प्रस्ताव तयार केला असून प्रशासकीय मंजुरी मिळताच ते करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.