त्या ६५ इमारतीतील रहिवाशांच्या हक्कांसाठी बैठक संपन्न
जनता दरबारात ना. गणेश नाईक यांनाही रहिवासी घालणार साकडे
डोंबिवली : डोंबिवली मधील ६५ इमारतीवर कारवाईची टांगती तलवार लटकत असल्याने या इमारतींमधील रहिवाशांच्या मदतीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) या दोन पक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने २२ फेब्रुवारी रेाजी डोंबिवली पूर्व मधील हेरिटेज सभागृहात ‘शिवसेना'तर्फे रहिवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता तज्ञ मंडळीची बैठक घेतली. येत्या २४ फेब्रुवारी ठाणे मध्ये ना. गणेश नाईक यांच्या जनता दरबारात जाणार असून त्या ६५ इमारतीतील रहिवाशांसह शिवसेना केडीएमसी मुख्याल्यावर भव्य मोर्चा काढणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच इमारतीतील नागरिकांच्या वतीने न्यायालयात स्थगिती (स्टे) घेण्यासाठीही जाणार असल्याचे सांगितले.
सदर बैठकीत ‘शिवसेना'चे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, वास्तुविशारद संदीप पाटील, ‘राष्ट्रवादी'चे भाऊ पाटील, काँम्रेड काळू कोमास्कर, तीन वकील, आदिंनी मार्गदर्शन केले. इमारतीतील अनेक रहिवाशी बैठकीत हजर होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुरुवातीला वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सदर इमारतींबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. यात कोण दोषी आहेत? कक्षा पध्दतीने विकासकाने रहिवाशांची फसवणूक केली यावरही बैठकीत माहिती देण्यात आली.
वकिलांनी कायदेशीर बांबीवर प्रकाश टाकत रहिवाशांनी न्यायालयात आपली बाजू मांडून आपली फसवणूक कशी झाली? असे सांगणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच कायदेशीर लढा महत्वाचा असल्याचेही सांगितले.
त्या ६५ इमारतीतील रहिवाशांसह शिवसेना महापालिका मुख्याल्यावर भव्य मोर्चा काढणार आहे. तसेच येत्या २४ फेब्रुवारी रोजीही ठाणे जिल्हा संपर्कमंत्री ना. गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही जाणार आहे. रहिवाशांनी आपली फसवणूक झाल्याबद्दल विकासकावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत. ज्यांनी ज्यांनी रहिवाशांची फसवणूक केली त्यांच्याविरोधात डोंबिवली मधील चारही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज करणार आहे. महापालिका मुख्यालयात काढण्यात येणारा मोचा शांततेने काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचे फलक हाती घेतले जाणार नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, एकदा फसवणूक होऊनही पुन्हा रहिवाशांची फसवणूक होत आहे. विकासक प्रत्येक इमारतीमागे २.५० लाख रुपये प्रमाणे १.५० कोटी रुपये घेत असल्याचा गौप्यस्फोट सदर बैठकीत जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला. तसेच या प्रकाराची पोलिसांनी दखल घेणे आवश्यक असल्याचेही म्हात्रे म्हणाले.