कर थकबाकीदार कारखाने, हॉटेल्स, लॉजवर महापालिकेची जप्ती कारवाई

पनवेल : पनवेल महापालिकेच्या ‘कर संकलन-कर आकारणी विभाग'च्या वतीने मालमत्ता कर न भरणाऱ्या नावडे उप-प्रभागातील तळोजा एमआयडीसीमधील थकीत मालमत्ता कर असणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर कळंबोली मधील थकीत मालमत्ता कर असणाऱ्या हॉटेल्स, लॉजवर महापालिकेने अटकावणी कारवाईला सुरुवात केली आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेप्रमाणे कर थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसानंतर ७ दिवस दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन मालमत्ता कर न भरलेल्या, वॉरंट नोटिसा देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या आस्थापनांवर अटकावणी आणि जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

आतापर्यंत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे ४४७ जप्तीपूर्वीच्या नोटिसा आणि २७ वॉरंट नोटिसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिका तर्फे देण्यात आला आहे.

आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु, आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपायुक्त स्वरुप खारगे तसेच कर अधीक्षक महेश गायकवाड आणि सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली जप्ती कारवाई आणि वसुली कारवाईसाठी मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. वसुली कारवाईला गती देण्यासाठी येत्या दिवसांमध्ये वसुली पथकामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने तसेच महापालिकेच्या वतीने प्रसिध्दी माध्यमातून केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या मनातील शंकाचे निरसन झाले आहे. त्यामुळे कर भरण्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मालमत्ता कराच्या भरण्यामध्ये भरघोस वाढ होताना दिसत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात ३ लाख ५० हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदि नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड' तयार केले आहे.

महापालिकेने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’  मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www.panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

त्या ६५ इमारतीतील रहिवाशांच्या हक्कांसाठी बैठक संपन्न