‘केडीएमसी' क्षेत्रात अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या नोंदणी सुरुच

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत इमारतींचा विषय गाजत असताना या अनधिकृत इमारतींचे रजिस्ट्रेशन होत असल्याचा धक्कादायक आरोप ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात दिपेश म्हात्रे यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. यावेळी कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, शहरप्रमुख सचिन बासरे, अभिजीत सावंत, प्रकाश तेलगोटे आदिंसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.  

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असून, यामुळे शासनाचा आणि नागरिकांचा मोठा आर्थिक तसेच कायदेशीर फसवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या खोट्या सही आणि शिक्क्यांचा वापर करुन बनावट परवानग्या तयार करण्यात आल्याचे उघड झाले होते. यामुळे शासनाची दिशाभूल झाल्याने शासनामार्फत २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या नोंदणीवर बंदी घातली होती.

परंतु, बंदी असतानाही काही भ्रष्ट अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाच स्वीकारुन अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांची नोंदणी करत असल्याचा आरोप दिपेश म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकारामुळे शासनाची दिशाभूल होऊन नागरिकांची फसवणूक होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि कायदेशीर कारवाई करावी. तसेच सर्व अनधिकृत नोंदण्या त्वरित रद्द करुन भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२४.३८ लाख वीज ग्राहकांकडून ‘ऑनलाईन पेमेंट'