बदलापूर येथे ड्रोन फ्लाईंग, नक्शा प्रकल्पाचा शुभारंभ

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील मिळकतींचे अचूक भूमापन करुन नकाशे आणि मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ‘नक्शा' प्रकल्प सुरु केला आहे. त्यामुळे आगामी काळात जमिनीचे वाद तसेच इमारतींना परवानगी देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी टळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

त्याअनुषंगाने कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या घोरपडे चौक, कात्रप येथील सभागृहात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आणि ड्रोन पलाईंगचा शुभारंभ आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. याप्रसंगी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर, भूमी अभिलेख अधीक्षक बासाहेब रेडेकर, उपसंचालक अनिल माने, नगरपरिषदचे नगररचनाकार मुळे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते.

यावेळी प्रकल्पाची माहिती देण्यात आल्यानंतर ड्रोन फ्लाईंगचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यासाठी देशभरातील ३५ हजार चौरस कि.मी. क्षेत्र असलेल्या १ हजार नगरपालिकांपैकी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदची निवड झाली आहे. या प्रकल्पांतर्गत पुढील २ महिन्यात ड्रोनद्वारे नगरपरिषद हद्दीत एरियल सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर साईट सर्व्हे करुन अचूक भूमापन नकाशे तयार केले जाणार आहेत. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे ६ महिन्यात नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणे अपेक्षित आहे.

दम्यान, या प्रक्रियेत शास्त्रशुध्द पध्दतीने अचूक भूमापन होणार असल्याने यासंदर्भातील वाद टळणार आहेत. त्याशिवाय नगरपरिषदच्या नगररचना विभागाला बांधकाम परवानगी देतानाही ते उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सदर प्रकल्प राबविल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

मराठी भाषेचे अभिजातपण जपतानाच तिच्या विकासाकडेही लक्ष देण्याची प्रत्येकाची जबाबदारी – डॉ.नरेंद्र पाठक