उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १९,५१८ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण

नवी मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१,३९९ सदनिकांच्या महासोडतीच्या माध्यमातून एकूण १९,५१८ नागरिकांचे ‘सिडको'च्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर' या योजनेद्वारे घरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असल्याची भावना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, एका क्लिकवर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते १९,५१८ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घरे' या लॉटरीची ऑनलाईन सोडत १९ फेब्रुवारी रोजी काढण्यात आली. याप्रसंगी ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, डॉ. राजा दयानिधी, गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुवत मंगेश चितळे, यांच्यासह ‘सिडको'तील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सिडको'च्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त ‘सिडको'ने दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘सिडको'ची घरे टाटा, एल.ॲण्ड टी., शापूरची यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय  दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता अटल सेतूमुळे २० मिनिटात प्रवास होतो. आता ठाणे ते विमानतळ असा डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात ३ कोटी घरे देण्याचे जाहिर केले असल्याने महाराष्ट्रात २० ते २५ लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास ना. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे. त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व संस्थांना एकत्र करुन रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहिर केले. समुह विकास माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे ना. शिंदे म्हणाले.

दरम्यान, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी एमटीएचएल प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे पलेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी रिमुव्हर्स सर्कुलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे पलेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरुन शासन प्रो इन्व्हायर्नमेंट प्रकल्प करते आहे, ते दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणली जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदिंचा यात अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सदर सोडतीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओद्वारे दिलेला संदेश प्रसारित करण्यात आला. आपल्या संदेशामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिडको'ची गृहनिर्माण योजना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारणारे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. तसेच नवी मुंबई भविष्यातील विकासाचे केंद्र असून ‘सिडको'च्या योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबांना नवी मुंबईमध्ये हक्काचे घर मिळाले असल्याचे ना. फडणवीस यांनी संदेशाद्वारे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महासोडत कार्यक्रमासाठी दिलेल्या संदेशाचेही यावेळी वाचन करण्यात आले. आपल्या संदेशामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी सदर महासोडत प्रक्रिया ‘सर्वांसाठी घरे' या संकल्पपूर्तीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन केले. अनेक सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणे, आनंदाचा क्षण असल्याचे मत देखील त्यांनी या संदेशाद्वारे व्यक्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्ट्रक्चरल हृदयरोगाविषयी वेळीच तपासणी गरजेची