उल्हासनगर मधील रस्ते सुस्थितीत करा; अन्यथा आंदोलन
उल्हासनगरः शहरात ‘एमएमआरडीए'कडून सिमेंट काँक्रीटकरणाची कामे सुरु आहेत. कामांमुळे सर्वत्र रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिनी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील रस्ते त्वरित सुस्थितीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'ने ‘एमएमआरडीए'ला दिला आहे.
शहरातील रस्ता काँक्रीटीकरणाची कामे संथ गतीने होण्याबरोबरच काही कामांच्या वर्कऑर्डरची मुदत संपूनही बराच काळ लोटला आहे. परंतु, प्रशासन देखील कामे वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून यासाठी प्रयन्तशील दिसत नाही किंवा प्रशासनाला नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाशी काही देणे-घेणे नाही. खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचा अडथळा होऊन अनेक अपघात होत आहेत. शहरातील हवेचे प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशी गंभीर परिस्थिती असुनही आजपर्यंत कामात दिरंगाई आणि नित्कृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कुठलीही कारवाई ‘एमएमआरडीए'द्वारे करण्यात आलेली नाही, असा आरोप ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केला आहे.
नेताजी चौक ते कैलास कॉलनी या रस्त्याचे काम येत्या महाशिवरात्रीच्या पूर्वी होणे अपेक्षित होते. महाशिवरात्रीला अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात मोठी यात्रा भरते. याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. उल्हासनगर येथून शिवमंदिराला जाणारा हाच प्रमुख रस्ता आहे. एकीकडे खोदलेले रस्ते तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणात होणारी गर्दी, याचे नियोजन वेळेत झाले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या संदर्भात ‘एमएमआरडीए'ने उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु, ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी प्रशासन या रस्त्यांबाबत झोपेचे सोंग घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया बंडू देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत बंडू देशमुख आणि संजय घुगे यांनी ‘एमएमआरडीए'चे मुख्य अभियंता धनंजय चामलवार आणि अभियंता अमोल जाधव यांना लेखी निवेदन देऊन महाशिवरात्रीच्या अगोदर २४ फेब्रुवारी पर्यंत भाविकांसाठी रस्ता सुव्यवस्थित करा. अन्यथा ‘मनसे'च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.