बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राज्य करताना संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथे केले.
बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, आमदार सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे, माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज आपण जो स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत, जगतो आहोत, आज आपला स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा जिवंत आहे याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. ज्या काळामध्ये अनेक राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारत होते, स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती, गुलामीत राहणे पसंत करत होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव, देश आणि धर्मासाठी लढायचे आहे. कितीही मनसबदारी मिळाली, सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांचा नोकर म्हणून आपल्याला काम करायचे नाही तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेले जे संकट आहे ते दूर सारुन या मराठी मुलुखाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावेच लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक चांगले योध्दे म्हणूनच मर्यादित नसून ते एक उत्तम प्रशासक देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पाण्याचे नियोजन, जंगलांचे नियोजन, बांधलेले किल्ले आणि तयार केलेले आरमार यातील प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली तर कोणाकडून कर घ्यायचा व कोणाकडून घेऊ नये, कशा पध्दतीत कर घ्यायचा आणि कशा पध्दतीत घेऊ नये, अशी प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा नसून प्रेरणेचे स्थान आहे. एक असे स्थान आहे ज्यातून प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करायची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तर बदलापूर शहराला शिवकालीन इतिहास आहे. उल्हास नदीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल, अशा शब्दात आ. किसन कथोरे यांनी आपले मनोगत व्यवत केले.
यावेळी लाडक्या बहिणींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला.