अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषदेत नमुंमपा आयुक्त शिंदे यांचे जलव्यवस्थापन, होल्डींग पाँडचा उपयोग यावर सादरीकरण

नवी मुंबई : उदयपूर, राजस्थान येथे संपन्न होत असलेल्या ‘दुसरी अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषद २०२५ – भारत @ 2047 : जलसुरक्षित देश (2nd All India State Water Ministers Conference 2025 India @2047 A Water Secure Nation )’ या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांस ‘किनारपट्टीवरील शहरातील शाश्वत आणि प्रभावी पाणी वापर : नवी मुंबई महापालिकेचा तपशीलवार अभ्यास (‘Sustainable & Efficiant Use of Water in Coastal : Case Study of Navi Mumbai Municipal Corporation) या विषयावर सादरीकरण करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्री ना..सी. आर. पाटील, देशभरातील विविध राज्यांचे जलमंत्री, केंद्रीय जल मंत्रालयाचे सचिव तसेच अन्य सचिव तसेच मान्यवर प्रतिनिधींसमोर नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील जलवितरणाची अत्यंत प्रभावी कार्यप्रणाली तसेच पूरपरिस्थिती उद्भवू नये याकरिता होणारा होल्डींग पाँडचा उपयोग याबाबत माहितीपूर्ण सादरीकरण केले. अशाप्रकारे केंद्रीय स्तरावर नवी मुंबईची जलव्यवस्थापनातील वैशिष्ट्यपूर्णता दर्शविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणाचा बहुमान मिळणे नवी मुंबई शहराचा गौरव आहे.

याप्रसंगी आयुक्तांनी नवी मुंबई शहराच्या निर्मितीपासूनच्या वेगळेपणाची माहिती देत नवी मुंबई शहर नियोजन व भविष्यातील संकल्पना यांची सविस्तर मांडणी केली. स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे जलसमृध्द असणा-या नवी मुंबई शहरातील जलवितरण प्रणालीची माहिती देत आयुक्तांनी स्काडासारख्या अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून प्रभावी जलनियोजनाविषयी माहितीपूर्ण भाष्य केले. 24 x 7 पाणीपुरवठ्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बेलापूर विभागापासून प्रायोगिक स्वरूपात सुरूवात करण्यात आल्याचे सांगत त्यांनी जलवितरण प्रणालीत ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर केला जात असल्याचे आवर्जून सांगितले.

त्यासोबत आयुक्तांनी मलमिश्रीत पाणी व वापरानंतरचे पाणी अशा दोन्हींबाबत महानगरपालिका राबवित असलेल्या मलनि:स्सारण व्यवस्थापन प्रणालीची माहिती दिली. यामध्येही स्काडा प्रणालीचा वापर करण्यात येत असून नागरिकांनी गरजेपुरताच पाणी वापर करावा यावर भर दिला जात असल्याचे सांगितले.

नमुंमपाची अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रे तसेच टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट यांची माहिती देत उद्योगसमुहांना शुध्दीकरण केलेले पाणी पुरविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय हे प्रक्रियाकृत पाणी उद्याने, बांधकामे, आरएमसी प्लान्ट, सोसायट्यांना पिण्याव्यतिरिक्त कामांच्या वापरासाठी तसेच एनएमएमटी बसेस धुणे अशा प्रकारे पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरले जात असून यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

याशिवाय शहर निर्मितीच्या वेळी सिडकोने शहरात निर्माण केलेल्या डच पध्दतीच्या होल्डींग पाँडच्या रचनेची वैशिष्ट्ये सांगत विशेषत्वाने पावसाळी कालावधीत पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून तसेच  भरतीच्या वेळी होल्डींग पाँडचा होत असलेला मोठ्या प्रमाणावरील उपयोग आयुक्तांनी सांगितला. याबाबतचा लघुपटही यावेळी दाखविण्यात आला.

नवी मुंबई महापालिकेने किनारपट्टीवरील शहरांची विशेषता जपताना जल व्यवस्थापनाकडे अत्यंत काळजीपूर्वक विशेष लक्ष दिलेले असल्याने राष्ट्रीय स्तरावर नमुंमपाच्या शाश्वत व प्रभावी पाणी वापराविषयी, प्रक्रियाकृत पाण्याचा पुनर्वापर करून पिण्याच्या पाण्याच्या बचतीविषयी तसेच होल्डींग पाँडच्या उपयोगाविषयी सादरीकरण करण्याचा बहुमान महापालिकेस लाभला.  या परिषदेस नमुंमपा अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण