भिवंडीत पीओपी मूर्ती विकण्यास मनाई

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे २५ हजारापेक्षा जास्त गणेशमूर्ती विक्री होत असून त्यामध्ये जास्तीत जास्त प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मुर्त्यांची विक्री केली जाते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने यावर्षी महापालिका क्षेत्रात प्लास्टर पासून बनविलेल्या मुर्ती विकू नये, अशी कडक भूमिका घेतल्याने मूर्ती विक्रेते अडचणीत आले आहेत.

भिवंडी महापालिका क्षेत्रात व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने आलेले देशातील सर्व राज्यातील नागरिक स्थायिक झाले आहेत. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे आकर्षण आणि भक्तीच्या निमित्ताने मराठी नागरिकांसह इतर हिंदू कुटुंबे देखील या उत्सवात सहभागी होत असल्याने शहरात मोठ्या संख्येने गणेशमुर्तींची विक्री होत असते. मात्र, शहरात मोजक्याच मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा असून इतर व्यावसायिक मूर्ती विक्रेते आयत्यावेळेस प्लास्टरच्या मुर्त्या विक्रीस आणून आपला व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे अनेकवेळा शाडुच्या माती पासून मूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांना फटका बसत आहे. असे मूर्तिकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. परंतु, शहरात मोठ्या संख्येने कामगार वर्ग राहत असल्याने त्यांचा नेहमी पीओपीच्या मुर्त्या खरेदी कारण्याकडे कल राहिला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शहरात प्लास्टर ऑफ परिसरच्या मुर्त्यांची विक्री होते.

शहरात आणि परिसरात सुमारे ४० हजार पीओपी मुर्तींची विक्री होते. त्यापैकी १५ हजार शाडूच्या मातीच्या मुर्ती विकल्या जातात. तर इतर २५ हजार तयार प्लास्टरच्या मुर्तींची विक्री होते. महपालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविल्यास ४० हजार शाडूच्या मुर्ती बनविण्याऱ्या मूर्तीकारांना लागणारे सहकार्य महापालिका प्रशासनास करावे लागणार आहे.तसेच शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तीकारांनी पुढाकार घेतल्यास महापालिका प्रशासनाची जबाबदारी वाढणार असून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीच्या विक्रेत्यांवर कारवाई करणे क्रमप्राप्त होणार आहे. या सर्व घटनांमुळे गेल्या २० वर्षांपासून प्लास्टर ऑफ परिसच्या मूर्ती विकणाऱ्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम होणार असून ते सध्या अडचणीत आले आहेत.

भिवंडी महापालिकेत नुकतीच पीओपीच्या मूर्ती विक्रीबाबत अतिरिक्त आयुक्त वि्ल ढाके यांच्या अध्यक्षतेखाली मूर्तीकारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ढाके यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीची माहिती देत प्लास्टरच्या मूर्ती न बनविण्यासाठी मूर्तीकारांना आवाहन केले आहे. तर यावेळी मूर्तीकारांच्या अडचणी समजून घेत त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
-सुदाम जाधव, नियंत्रण अधिकारी-प्रदुषण विभाग, भिवंडी महापालिका.

मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतल्यास मूर्तीकारांना रोजगार निर्माण होईल. त्यासाठी शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने मूर्तीकारांना अपेक्षित सहकार्य केले पाहिजे. अन्यथा मूर्ती बनविण्याच्या खर्चात वाढ झाल्यास मूर्तीकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती बनविण्यासाठी पुढाकार घेतील.
-दिलीप चौघुले, मूर्तीकार, टिळक चौक-भिवंडी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘टीएमसी'तर्फे १०० कोटींची पाणी बील वसुली