कर थकबाकीदारांवरील कारवाईला ब्रेक

खासदार शिंदे, आमदार आयलानी यांच्या सुचनेची महापालिकाकडून अंमलबजावणी

उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर बुडवणाऱ्यांसाठी आता कोणतीही अभय योजना राबविण्यात येणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार कुमार आयलानी यांनी या कारवाईमध्ये हस्तक्षेप करुन करथकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करा, असे निर्देश आयुक्त मनीषा आव्हाळे यांना दिले आहेत. त्यानुसार आयुक्त आव्हाळे यांनी देखील थकीत कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या या भूमिकेमुळे मालमत्ता कर बुडविणाऱ्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या कारवाईला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर महापालिकेचे मालमत्ता कर प्रमुख उत्पन्नाचे स्तोत्र आहे. मात्र अपेक्षित मालमत्ता कर वसूल होत नसल्याने आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतर मालमत्ता कर बुडविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्त आव्हाळे यांनी यंदा अभय योजना नाही तर थेट तुमच्या दारात वाजत-गाजत मनपाचे पथक येऊन वसुली करणार, असा इशारा दिला होता. कर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून गेल्या १० दिवसात १२८ घरांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ३१२५ घरांना वॉरंट पाठविण्यात आले असून ४८ मालमत्तांवर जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत.

उल्हासनगर महापालिकेची धडक कारवाई सुरु असतानाच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या गोल मैदान येथील संपर्क कार्यालयात जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले होते. यावेळी खासदार शिंदे, आमदार कुमार आयलानी, महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासह महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिकेकडून मालमत्ता कर बुडविणाऱ्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाई बाबत चर्चा झाली. त्यावर आमदार आणि खासदार यांनी मालमत्ता धारकांना एकदा संधी देऊ अभय योजना लागू करण्याची सूचना महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना केली. यानंतर आयुक्त आव्हाळे यांनी चालू आर्थिक वर्षातील शेवटची अभय योजना लवकरच कार्यान्वित केली जाईल. तसेच शहरवासीयांनाही त्याबाबत माहिती दिली जाईल, असे आश्वासन या बैठकीत दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडीत पीओपी मूर्ती विकण्यास मनाई