उरण तहसील, पोलीस ठाणे परिसराने घेतला मोकळा श्वास
उरण : उरण पोलीस ठाण्याच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले होते. गेली काही महिने या ठिकाणचा कचरा काढलाच नव्हता. याबाबत काही जागरुक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करु पाहणारे कचऱ्याचे साम्राज्य दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उरण तहसील आणि पोलीस ठाणेच्या परिसरात उभ्या-आडव्या पार्किंग करुन ठेवल्या जाणाऱ्या गाड्या योग्य प्रकारे लावल्या जाव्यात यासाठी सदर जागेवर लोखंडी अडथळा लावण्याचे काम हाती घेतल्याने सध्या या परिसरातील जागेने मोकळा श्वास घेता असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
उरण तहसील आणि उरण पोलीस ठाणे समोरची जागा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उरण नगरपरिषद यांच्या ताब्यात आहे, तर आतील आणि बाहेरील बाजू स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. मात्र, गेले काही महिने या विभागातील समन्वयाअभावी येथील कचरा उचलला जात नव्हता. तसेच या ठिकाणी कामानिमित्त येणारे भांडवलदार, व्यावसायिक, काही नागरिक आपली वाहने सदर जागेत आडवी-उभी पार्क करुन ठेवत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना येता-जात होत असल्याने नागरिकांनी त्याबाबत वारंवार नाराजी व्यक्त केली. तसेच घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी आणि रहदारीचा रस्ता मोकळा करण्यासाठी मागणी केली.
अखेर या गंभीर प्रकाराची दखल घेत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी सदर घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच वाहनांना प्रवेशबंदी तसेच शिस्तीचे धडे मिळावे यासाठी लोखंडी अडथळे लावण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांचे आभार व्यक्त केले आहे.