नमुंमपा, एनएमएमटी मधील कंत्राटी कामगारांना लवकरच वेतनवाढ
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामध्ये (एनएमएमटी) कार्यरत विविध संवर्गामधील कंत्राटी, ठोक, रोजंदारी, ६ महिने नियुक्ती, करार पध्दत तत्वावरील कामगारांची वेतनवाढ आणि त्यांच्या अन्य सुविधांबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर ‘श्रमिक सेना'सह इतर कामगार संघटनांनी केलेल्या मागणीनुसार नवी मुंबई महापालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या वेतनाबाबत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मंत्रालयीन दालनात १७ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी खासदार तथा ‘श्रमिक संघटना'चे अध्यक्ष संजीव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कामगार आयुक्त तुमोड, उपायुक्त प्रदीप पवार, वाघ, सहाय्यक कामगार आयुक्त राऊत यांच्यासह विभागाचे अधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकामध्ये सुमारे ८००० साफसफाई कर्मचारी ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. तर ‘एनएमएमटी'मध्ये १४०० आणि महापालिकामध्ये १००० असे कर्मचारी ठोक मानधन, रोजंदारी, आणि ६ महिने नियुक्ती तत्वावर कार्यरत आहेत. यामध्ये स्वच्छता कर्मचारी, शिक्षक, परिचारिका, अभियंता, डॉक्टर, वाहक, चालक, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा आणि अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतु, २०१० पासून या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावेत त्यासाठी वेळोवेळी कामगार संघटनांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीच्या प्रश्नावर ना. गणेश नाईक यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली.
ना. आकाश फुंडकर यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीसाठी नियुक्त केलेल्या ‘श्रीवास्तव समिती'चा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले. महापालिका स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी समितीचा अहवाल प्राप्त होताच पुढच्या एका आठवड्यात वेतनवाढीचा निर्णय घेऊन सदरचा प्रश्न मार्गी लावावा, असे महापालिका प्रशासनाला आदेशित केले. नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने सदर निर्णय फक्त नवी मुंबई महापालिकेला लागू होत असल्याचेही ना. फुंडकर स्पष्ट केले.
दरम्यान, कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय त्या त्या महापालिका, नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावा, असे ना. आकाश फुंडकर यांनी बैठकीत सूचित केले.