आनंदवनसाठी नवी मुंबईतून शाश्वती निधी
नवी मुंबई : बाबा आमटे निर्मित महारोगी सेवा समिती वरोरा अर्थात आनंदवन या संस्थेला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली असून गेल्या ७५ वर्षात आनंदवनमध्ये महारोग झालेल्या लाखो नागरिकांवर इलाज करुन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी झालेले प्रयत्न, दुर्बल घटक आणि दिव्यांगांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी निर्माण केलेले उद्योग हे एक मोठे कार्य म्हणून मान्यताप्राप्त आहे. मात्र कोविड नंतर जनतेकडून येणारा आर्थिक ओघ कमी झाल्यामुळे संस्थेला मोठ्या आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्याकरीता संस्थेचे सचिव डॉक्टर विकास आमटे आणि त्यांचे सुपुत्र कौस्तुभ यांनी संस्थेला शाश्वत निधी निर्माण करण्याकरता आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद म्हणून आनंदवन मित्र मंडळ नवी मुंबई तसेच मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ वाशी आणि प्रभात ट्रस्ट या संस्थांच्या सभासदांनी मागील महिन्याभरात सुमारे पाच लाख रुपये देणगी जमवून त्याचा धनादेश आनंदवनमध्ये झालेल्या आनंदवनाच्या ७५ व्या वर्धापनदिनी डॉक्टर विकास आमटे यांना देण्यात आला. कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय यातील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातील एक रुपया दोन रुपये बॉक्समध्ये टाकून १३७५० रुपये जमा केले आणि ते आनंदवनला देणगीरूपाने देऊन अनोखे उदाहरण निर्माण केले आहे.