जपानी मार्केट मधील भुयारी गटाराचा प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प-२ येथील जपानी मार्केटमध्ये काही नेहमी ड्रेनेज चोक होऊन मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहते. त्यामुळे दुकानदार, व्यापारी, ग्राहक यांना नेहमी समस्येचा सामना करावा लागतो. यासंदर्भात ‘उल्हासनगर व्यापारी असोसिएशन'चे (यूपीए) राजेश टेकचंदानी यांच्यासह माजी महापौर तथा ‘राष्ट्रवादी काँग्रेस'चे शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी आणि टिओके प्रमुख ओमी कलानी यांनी महापालिका आयुक्त मनीषा आवळे यांच्याकडे भुयारी गटार समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.
या समस्येची सविस्तर माहिती देताना राजेश टेकचंदानी म्हणाले की, जपानी मार्केट उल्हासनगर शहरातील सर्वात जुनी आणि प्रमुख किरकोळ बाजारपेठ असून सन-२००६ मध्ये ते जपानी मार्केटचे अध्यक्ष असताना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा स्व.ज्योती कलानी यांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक आणि फुटपाथचे काम करण्यात आले होते. इतकी वर्षे नियमित साफसफाई होत असल्याने तेथे बांधण्यात आलेल्या भुयारी गटारात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. मात्र, काही काळापासून भुयारी गटार बंद पडल्याने ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर सुमारे १० दिवसांपूर्वी उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या १०० दिवसांच्या खोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत ४० सफाई कर्मचाऱ्यांनी विभागीय अधिकारी मनीष हाविरे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी विनोद केणे यांच्या उपस्थितीत जपानी मार्केट मधील नाला साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरल्याचे टेकचंदानी यांनी सांगितले.
महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार सुमारे ३ दिवसांपूर्वी सक्शन मशिनच्या सहाय्याने नाल्यातील चोक काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तरीही तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे नवीन नाला बनविण्याचा लेखी अहवाल स्वच्छता अधिकारी विनोद केणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला होता, असेही टेकचंदानी यांनी सांगितले.
दरम्यान, जपानी बाजारपेठ मुख्य व्यापारी क्षेत्र असून तेथे व्यापारी तसेच ग्राहक आणि इतर लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा स्थितीत आपण आयुक्तांकडे ३ वेळा ई-मेलद्वारे तक्रार केली असून, माजी महापौर पंचम कलानी आणि टीओके प्रमुख ओमी कलानी यांनी देखील पत्र पाठवून सदर नाल्याचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन पावसाळा सुरु होण्यापूर्वीच भूमीगत गटाराचा प्रश्न मार्गी लागावा. अन्यथा पावसाळ्यात संपूर्ण पाणी वाहून जाण्याची समस्या निर्माण होईल, याकडे ‘यूपीए'च्या माध्यमातून राजेश टेकचंदानी यांनी आयुक्त आव्हाळे यांचे लक्ष वेधले आहे.