बॅचिंग प्लांट बंद करा; अन्यथा रस्त्यावर उतरु

ठाणे : ठाणे-घोडबंदर रोडवर बोरिवडे गावाच्या परिसरात सुरु असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून नागरिक आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. वाढती धूळ आणि ध्वनी प्रदुषण, वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात रोष उफाळून आलेला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात स्थानिक नागरिकांनी प्लांट बंद न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी आपली कैफियत मांडलेली आहे. बोरिवडे गाव परिसरात तयार होणाऱ्या प्लांटमुळे नागरिक त्रस्त आहेत. बॅचिंग प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, वृध्द आणि नागरिकांना श्वासोच्छवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याची समस्या नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून मांडलेली आहे. या बेचिंग प्लान्टबाबत स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ठाणे मध्ये आता पुन्हा प्रशासन आणि नागरिकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात २ प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. ताबडतोब बॅचिंग प्लांट बंद करावा. काम किमान २ ते ४ तास बंद ठेवावे. नागरिकांच्या या आंदोलनालारौनक डिलाईट, विहंग व्हॅली फेज-१ आणि २, प्लॅटिनम लॉन्स, रौनक हाईटस्‌ एच-१, उन्नती ग्रीन्स जी-१ ते जी-४ या सोसायट्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. जर प्रशासनाने बैठक घेऊन त्वरित निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण परिसरात रास्ता रोको आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. त्यामुळे बोरिवडे येथील रहिवाशांच्या या इशाऱ्यामुळेे ठाणे महापालिका काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल न्यायालयातील बोगस वारस दाखला प्रकरण