एपीएमसी धान्य बाजारातील अनधिकृत बांधकामाला अखेर दुरुस्तीची परवानगी
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील धान्य बाजार मधील डब्ल्यू विंग मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली बांधकाम सुरु होते. मात्र, सदर बांधकाम अनधिकृत ठरवत नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाने त्यावर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कारवाई केली होती. परंतु, सदर बांधकामास आता दुरुस्तीची परवानगी देण्यात आल्याने सदर बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
एपीएमसी धान्य बाजारातील डब्ल्यू विंग मध्ये २५ हजार चौरस फुट जागेवर दुरुस्तीच्या नावाखाली तोडफोड करुन विनापरवाना बांधकाम सुरु करण्यात आलेले होते. जवळपास २५ हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या ८० गाळ्यांची तोडफोड करुन एकत्रीकरण केले जात होते. एपीएमसी बांधकाम उप समिती आणि संचालक मंडळाच्या सभेत कोणतीही परवानगी न घेता ७०-८० कार्यालयांची ब्रेकर द्वारे तोडफोड आणि एकत्रीकरण करुन बांधकाम केले जात होते. धान्य बाजारातील डब्ल्यू विंगमध्ये व्यापाऱ्यासाठी असलेली कार्यालये एका खाजगी संस्थेला देण्यात आली आहेत. त्यामुळे कार्यालय दुरुस्तीच्या नावाने तोडफोड करुन एकत्र करण्याचे काम सुरू होते. मात्र, या बांधकामामुळे इमारतीच्या मूळ रचनेला धक्का बसला असून, कधीही इमारत पडू शकते, अशी शवयता निर्माण झाल्याने नोव्हेंबर-२०२४ मध्ये सदर बांधकाम थांबवण्याची नोटीस देऊन कारवाई करत बांधकाम थांबवण्यात आले होते. मात्र, आता सदर संस्थेला गाळे एकत्रीकरण करण्यासाठी २००९ मध्ये परवानगी देण्यात आली होती.तर नोव्हेंबर - २०२४ मध्ये काम थांबवल्यानंतर सदर इमारतीचे संरचना परीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले होते. त्या अहवालात इमारत सी २ वर्गवारी मध्ये मोडत असून, इमारतीची दुरुस्ती करुन इमारत वापरात आणली जाऊ शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला असल्याने सदर इमारत दुरुस्तीची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती एपीएमसी कार्यकारी अभियंता सुरेश मोहाडे यांनी दिली. दुसरीकडे सुरेश मोहाडे यांनी दिलेल्या माहितीला महापालिका तुर्भे विभागातील कनिष्ठ अभियंता (अतिक्रमण) यांनी देखील दुजोरा दिला आहे.