सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित दशावतारी नाट्य महोत्सवाला नवी मुंबईतील रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नानाविध माध्यमांतून व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. 

अशाच प्रकारे कोकणच्या तांबड्या मातीचा गंध असलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सेक्टर-२४, जुईनगर येथील बंटस सभागृहात करण्यात आले आहे. 18 फेब्रुवारी पर्यंत  संपन्न होणाऱ्या या दशावतारी नाट्य महोत्सवात सादर होणाऱ्या कोकणातील नामांकित दशावतारी नाट्य मंडळांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी रसिकांनी पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनानुसार हा दशावतार नाट्य महोत्सव रसिकांची उत्साही दाद मिळवत साजरा होत असून प्रत्येक दिवशी रसिकांची गर्दी वाढत आहे. 

दशावतार ही महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील एक पारंपारिक लोकनाट्य शैली आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा नाट्यमय रितीने सादर केली जाते. यामध्ये सादर होणारा कलाविष्कार हा कलावंतांमार्फत उस्फूर्तपणे केला जात असल्याने दशावतार नाटकांची वेगळीच मोहिनी रसिकांवर आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, कणकवली आणि गोव्यातील काही भागांमध्ये ही कला अत्यंत लोकप्रिय असून हा अभिनव कलाप्रकार इतरही भागात सादर होऊन रसिकांपर्यंत त्याचे वेगळेपण पोहचावे व या लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या भूमिकेतून सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दशावतार महोत्सवाचे विविध शहरांमध्ये आयोजन करण्यात येत असते. 

यावर्षीचा दशावतारी नाट्य महोत्सव आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये आयोजित केला असून या माध्यमातून नवी मुंबईकरांसमोर दशावतारासारख्या अस्सल लोककलेचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये उलगडत आहेत. त्यामुळे रसिक नवी मुंबईकर नागरिक देखील ही दशावतार नाटके अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवित आहेत.

१३ फेब्रुवारी रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांच्या नाट्यप्रयोगाने महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली असून १४ फेब्रुवारी रोजी देवेंद्र नाईक चेंदवणकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांच्या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. १६ फेब्रुवारी रोजी सुट्टीच्या दिवशी जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा नाट्यप्रयोग मोठ्या उपस्थितीत रंगला. 

यापुढे १७ फेब्रुवारी रोजी आरोलकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळ, आरवली व ओंकार दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा दशावतार नाट्यप्रयोग  सादर झाला. तसेच १८ फेब्रुवारी रोजी श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळ, मानखुर्द व तेंडोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, झाराप यांच्या नाट्य प्रयोगाने या दशावतारी नाट्य महोत्सवाची सांगता होणार आहे.

दशावतार नाट्य महोत्सव पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी धान्य बाजारातील अनधिकृत बांधकामाला अखेर दुरुस्तीची परवानगी