रामशेठ ठाकूर विद्यालयात ‘पर्यावरण संसद' संपन्न
खारघर : माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन-संरक्षण याचे महत्व शालेय स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी तसेच संसदेचे कामकाज कसे चालते? ते विद्यार्थ्यांना समजावे यासाठी खारघर मधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय येथे पनवेल महापालिकेच्या वतीने अभिनव संकल्पना घेऊन ‘पर्यावरण संसद'चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. प्रशांत ठाकूर यांनी पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला सदर अभिनव उपक्रम उत्तम आहे. याचबरोबर संसदेमध्ये कायदे कशाप्रकारे मंजूर केले जातात, याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सदर उपक्रम उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आकाश, जल, वायू, भूमी, अग्नी या ‘माझी वसुंधरा अभियान'मधील महत्वाच्या घटकांची माहिती व्हावी या दृष्टीने १३ फेब्रुवारी रोजी ‘पर्यावरण संसद'चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात केएलई महाविद्यालय कळंबोली, पिल्लई कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स ॲन्ड सायन्स, एस. के. कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड सायन्स नेरुळ या ४ महाविद्यालयांचे विद्यार्थी, रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील १०० हुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, संस्थेचे संचालक संजय भगत, पनवेल महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख अनिल कोकरे, स्कुल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी, विद्यालयाच्या प्राचार्य निशा नायर उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत झालेल्या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. संसदेत ज्या प्रकारे कायदे पास होतात, त्याप्रमाणे या ‘पर्यावरण संसद'मध्ये पर्यावरणाशी संबंधित ८ प्रस्ताव यावेळी मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणीय समस्यांवर आधारित आपली मते मांडून शाश्वत पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणारे प्रस्ताव सादर केले. यामध्ये जलसंधारण, प्रदुषण नियंत्रण, हरित ऊर्जा, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी ‘माझी वसुंधरा'ची शपथ घेतली.