रांजणपाडा-तळोजा रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
खारघर : मुर्बी गावाकडून रांजणपाडा गाव मार्गे तळोजा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या खाजगी वाहनावर कारवाई करुन सदर वाहने हटविण्यात यावीत, अशी मागणी ‘आदर्श सेवा भावी संस्था'चे उपाध्यक्ष मेघनाथ ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुर्बी गावाकडून रांजणपाडा गाव मार्गे तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्या वर्षभरापासून जवळपास ५० ट्रॅव्हल्स बस अनधिकृतपणे उभ्या केल्या जात आहेत. विशेष म्हणजे रात्री बस चालक आणि वाहक ट्रॅव्हल्स मध्ये राहत आहेत. रात्री सदर रस्त्यावरुन महिला पायी तर काही दुचाकीने जात असतात. अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहना शेजारी वाहन चालक आणि वाहक उभे राहत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २० वर्षांपूर्वी सिबीडी सेक्टर-५ मधील गुरुद्वारा रस्त्यावर ट्रक चालकाकडून महिला छेडछाडीची घटना घडली होती. महिला विनयभंगाचा प्रकार खारघर मध्ये होवू नये याची काळजी घेवूननवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाने सदर रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करुन सदर बसेस हटविण्यात यावीत, असे ‘आदर्श सेवा भावी संस्था'चे उपाध्यक्ष मेघनाथ ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मुर्बी गावाकडून रांजणपाडा गाव मार्गे तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्या वर्षभरापासून जवळपास ५० ट्रॅव्हल्स बस अनधिकृतपणे २४ तास उभ्या असतात. रात्री या रस्त्यावरून महिला पायी तर काही दुचाकीवरुन जात असतात.सीबीडी सारखी घटना खारघर मध्ये घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाने सदर वाहनांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. - मेघनाथ ठाकूर, उपाध्यक्ष- आदर्श सेवा भावी संस्था, खारघर.