‘नमुंमपा'ला लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स' पुरस्कार

नवी मुंबई : ‘श्री अधिकारी ब्रदर्स'च्या ‘गव्हर्नन्स नाऊ प्रकाशन'च्या वतीने आयोजित ‘वेस्ट टेक सिम्पोजियम'मध्ये नवी मुंबई महापालिकेला स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार' प्रदान करुन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी सिने निर्मात्या कांचन अधिकारी आणि सिने अभिनेते महेश ठाकूर यांच्या हस्ते मुंबईतील विशेष समारंभात स्विकारला. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार उपस्थित होते.

शहरी पायाभूत सुविधा पुरविताना पर्यावरणाची काळजी घेऊन शाश्वत विकास साधला जावा, अशी संकल्पना नजरेसमोर ठेवून आयोजित या ‘वेस्ट टेक सिम्पोजियम'मध्ये ई-गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रात अभिनव काम करणाऱ्या कंपन्या तसेच महापालिकेशी निगडीत तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या संस्था त्याचप्रमाणे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यातील महापालिका आणि इतर शासकीय संस्था सहभागी झाल्या होत्या.

नवी मुंबई महापालिकेने नागरी प्रशासनात केलेला डिजीटल माध्यमांचा प्रभावी वापर आणि त्यामुळे सार्वजनिक सेवा वितरण करताना कार्यक्षमतेत झालेली वाढ, कामकाजात वृध्दींगत झालेली पारदर्शकता आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालेला प्रत्यक्ष लाभ अशा विविध बाबींचा विचार करुन नवी मुंबई महापालिकेला ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

तंत्रज्ञानाचा कामकाजात प्रभावी उपयोग करुन त्याचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणात व्हावा असा दृष्टीकोन जपत ‘नमुंमपा'ने दैनंदिन कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी उपयोग सुरू केला असून त्यामुळे कामकाजात सुलभता आली आहे. पारदर्शकता आणि गतीमानता वाढली आहे. तसेच कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा उपयोग कमी झाल्याने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही देखील मोठी बाब आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे माहितीची सुरक्षा वाढली असून माहितीची उपलब्धता जलद होत आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सेवा गतीमानतेने देता येणे शक्य होत आहे. याप्रमाणेच इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनींग प्रणाली यशस्वीरित्या अंमलात आणण्यात येत असून याद्वारे सर्व कार्यवाहीची इंटरकनेक्टिव्हिटी सुनिश्चित होणार आहे. तसेच युनिफाईड डॅशबोर्ड द्वारे महापालिकेतील सर्व विभागांच्या कार्याचे सर्वसमावेशक निरीक्षण करणे सुलभ होणार आहे.

‘नमुंमपा'मार्फत नागरिकांना पुरविण्यात येणा-या विविध प्रकारच्या लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सद्यस्थितीत जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी, पाणीपुरवठा, मालमत्ताकर विषयक विविध बाबी अशा ९० सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या असून आणखी १५ सेवा विकासाधीन आहेत.

त्यासोबतच नागरिकांना ‘नमुंमपा'शी संबंधित कोणत्याही कामाविषयी तक्रार, सूचना करावायाची झाल्यास त्यांच्याकरिता तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून नागरिक महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईमधील ॲपवरुनही तक्रार दाखल करु शकतात आणि त्यांच्या तक्रार निराकरणाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतात. याद्वारे नमुंमपा अधिक संवादी झाली असून नागरिकांकडूनही या प्रतिसादात्मक प्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. 

सध्याच्या सोशल मिडीयाप्रेमी युगात मोबाईलचा वापर लक्षणीयरित्या वाढला असून नवी मुंबई महापालिकेने ‘माझी नवी मुंबई -My NMMC-माझी नवी मुंबई' ॲप विकसित केले असून याद्वारे नागरिक आता मोबाईलवर ‘नमुंमपा'विषयी माहिती मिळवू शकतात, देयक भरणा करू शकतात, सूचना करु शकतात अथवा तक्रारही दाखल करु शकतात.  

लोकहिताय बाबींचा विचार करुना ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार' ‘नमुंमपा'ला प्रदान करण्यात आला. यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नवी मुंबईकर नागरिकांची महापालिकेशी संबंधित कामे तसेच आवश्यक लोकसेवा त्यांना महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे न लागता घरच्या घरी ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन कटीबध्द आहे. नागरिकांनी या डिजीटल माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रांजणपाडा-तळोजा रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी