प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याची काळजी घ्यावी -उपमुख्यमंत्री शिंदे

ठाणे  : ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतोच आहोत, आता ठाणे हरित शहर म्हणूनही प्रसिध्द व्हायला हवे. त्यात सगळ्यांनीच सहभाग घ्यावा. विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी. महापालिकेने त्याप्रमाणे उपक्रम आखावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ठाणे महापालिका तर्फे कॅडबरी जंक्शन नजिक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या १४व्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचा समावेश असलेल्या ‘वृक्षवल्ली-२०२५'चे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाणे महापालिकेने एक एकरच्या क्षेत्रात सेंद्रीय भाजीपाला पिकवावा. नागरिक तेथे भेट देतील, खरेदी करतील. अशाप्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका पहिलीच महापालिका ठरेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान) मधुकर बोडके, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील, आदि उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट, झाडे, फुले यांची पाहणी केली. खास वातानुकुलित कक्षातील विशेष रोपे, फुले यालाही त्यांनी भेट दिली. भातशेती, गावातील घराची प्रतिकृती, भाजीपाला विभाग, औषधी वनस्पती विभाग, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, विविध प्रकारचे स्टॉल यांचीही पाहणी त्यांनी केली.

यंदाचे प्रदर्शन ‘जैवविविधतेचे सप्तरंग' या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे २०० प्रजातींची फुलझाडे,  फळांची रोपटी,  रंगीबेरंगी फुले आणि पाने असलेली झाडे, औषधी वनस्पती आदि मिळून सुमारे ५ हजार रोपांचा समावेश आहे. सुमारे ९० संस्थांनी आकर्षक पुष्परचना, निसर्गाशी निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्रे यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली आहे. प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे (झुडुपे), कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (ऑर्कीडस्‌) कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीसह (कट पलॉवर) इतर असे एकूण ३० विभाग आणि पोटविभाग आहेत. तसेच यावर्षी लाईव्ह नेचर पेंटींग, तज्ञांच्या सहाय्याने वृक्षावर यंत्राच्या मदतीने रोहण करण्याचे प्रात्यक्षिक, हेरिटेज ट्री ट्रेल अशी प्रमुख आकर्षणे नागरिकांना अनुभवता येणार आहेत.

१६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचा समारोप...
प्रदर्शनामध्ये उद्यान विषयक वस्तुंच्या विक्रीसह बांबूपासून बनविलेल्या वस्तू, नैसर्गिक खतांचा वापर करुन उत्पादित भाज्या, हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञान आदि ४० दालनांचा समावेश आहे. ‘वृक्षवल्ली' प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समांरभ उद्या १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'ला लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स' पुरस्कार