वालरेक मॉड्युलर सिस्टम कंपनीवर जप्तीची कारवाई

पनवेल : महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार तळोजा औद्योगिक वसाहती मधील भूखंड क्र. जी-१३/४ येथील मे. वालरेक मॉड्युलर सिस्टम या कंपनीवर २ कोटी २० लाख ४० हजार ३८५ रुपयांच्या थकबाकीसाठी जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी बिल्डींग आणि तयार माल जप्त करण्यात आला.

या कार्यावाहीमध्ये प्रभाग अधिकारी अमर पाटील (नावडे), वसुली अधिकारी हरिश्चंद्र कडू, संजय देशमुख, दिलीप सावळे तसेच आदर्श पाटील, लालसिंग राठोड, एकनाथ ठाकूर, तळोजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि नावडे विभागातील कर्मचारी यांनी सषभाग घेऊन कार्यवाही यशस्वी केली.

महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा आणि वॉरंट बजावण्यास पनवेल महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत तळोजा औद्योगिक वसाहती मधील ५० उच्चतम कराची थकबाकी असणाऱ्या कंपन्यांना जप्तीपूर्व नोटिसांचे वाटप केले आहे. या कंपन्यांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागामधील सुमारे ३.५० लाख मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे. सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत ३२४ कोटी इतकी वसुली झाली आहे.

त्यानुसार मालमत्ता कर उपायुक्त स्वरुप खारगे आणि जप्ती पथकामधील अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्या अधीनस्त असलेल्या सर्व मालमत्ताधारकांना प्रवृत्त करुन लवकरात लवकर महापालिकेला मालमत्ता कराचा भरणा करुन सहकार्य करण्याचे आवाहन  केले आहे. तसेच मालमत्ता कराचा भरणा न केल्यास जप्ती आणि अटकावणी कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ आणि अनुसूची ड-प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महापालिकेला देय असलेल्या कराच्या थकबाकी पोटी जंगम स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करुन जाहिर लिलावाने विक्री करून थकबाकी वसूल करण्याची तरतूद महापालिकेला आहे. त्यानुसार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांना उपायुक्तांच्या सूचनेनुसार, कर अधीक्षक महेश गायकवाड आणि सुनिल भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत खारघर, उपविभाग नावडे, कळंबोली, कामोठे, पनवेल आणि नवीन पनवेल प्रभागामधील थकबाकीदारांना जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात येत आहेत.

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे शहर सुशोभिकरण मोहिमेअंतर्गत १६ किमी पट्टा करणार सुशोभित