वाळलेल्या गवतामुळे पारसिक हिलवर आगींच्या घटनांमध्ये वाढ
महापालिका व सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे जानेवारी-फेब्रुवारी नंतर पारसिक हिलवरील वाळलेल्या गवताला आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. बुधवारी सकाळी पारसिक हिलवर आग लागल्याने वृक्ष संपदेची प्रचंड हानी झाली.
प्रतिवर्षी लागणाऱया आगीमुळे नव्याने लावलेली झाडांची रोपे होरपळून जातात व पर्यायाने मृत पावतात. तर अस्तित्वात असणाऱया मोठमोठÎा वृक्षांना देखील या आगीची झळ पोहचून त्यांचे नुकसान होते. यामुळेच गेल्या अनेक दशकांपासून महापालिकेने आजवर लाखो वृक्षांची लागवड करून देखील पारसिकचा डोंगर बोडकाच राहिल्याचे चित्र पहायला मिळते. याची जबाबदारी स्विकारण्याऐवजी सिडको व महापालिका एकमेकांकडे बोट दाखवण्यातच धन्यता मानत आहे.
बेलापूर इथल्या पारसिक हिल वर वारंवार लागणाऱ्या आगीचे कारण हे वाळलेले गवत आहे हि बाब लक्षात घेऊन सजग नागरिक मंच नवी मुंबईच्या वतीने डिसेंबरमध्ये पारसिक हिलवरील वाळलेले गवत काढण्याची मागणी करणारे निवेदन सिडको व महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र आपल्या प्रशासकीय कार्यसंस्कृतीप्रमाणे सदरील निवेदनाला दोन्ही प्राधिकरणांनी केराची टोपली दाखवल्याचा आरोप सजग मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावर्षी आतापर्यंत पारसिक हिलवर आगीच्या ३ ते ४ घटना घडलेल्या आहेत. अजून तर संपूर्ण उन्हाळा सरायचा बाकी असल्याने आगीच्या घटना वाढत जाणार असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
बुधवारची आगीची घटना घडल्यानंतर पालिकेच्या उद्यान विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सिडकोने पारसिक हिल परिसर पालिकेला हस्तांतरित केलेला नसल्याने वाळलेले गवत काढण्याची जबाबदारी हि सिडकोची आहे. प्रश्न हा आहे की पालिकेच्या दाव्यात तथ्य असेल तर पालिका प्रतिवर्षी पारसिक हिलवर लाखो रुपये खर्च करून झाडे लावण्याचे कंत्राट कोणत्या हेतूने देते? सिडकोची आर्थिक स्थिती झाडे लावण्यासाठी सक्षम नाही का? असा प्रश्न सजग मंचने उपस्थित केला आहे.
जागतिक तापमान वाढ हि जीवसृष्टीच्या दृष्टीने सर्वात ज्वलंत समस्या झालेली असल्याने पर्यावरणाप्रती सरकारी यंत्रणांनी अत्यंत संवेदनशील असणे अभिप्रेत आहे. परन्तु प्रत्यक्षात सिडको आणि पालिकेचे पर्यावरणाप्रती केवळ वांझोटे प्रेम असल्याचे वारंवार दिसून येते. फणसवाडी येथील वाघोबा मंदिर परिसरात सिडकोने वड, पिंपळ, चिंच अशा प्रकारची 4 हजार झाडे लावल्याचा फलक लावलेला आहे. परंतु, प्रत्यक्षात या झाडांची संख्या हाताच्या बोटांइतकीपण नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिका दरवर्षी लावत असलेली हजारो झाडे गायब कशी होतात असा प्रश्न पडला आहे. कारण कंत्राटदाराला फक्त झाडे लावण्याचे कंत्राट दिले जात नसून त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्या कंत्राटात नमूद केलेली असते. मात्र महापालिकेच्या अधिकाऱयांना या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसून येते.
वृक्ष लागवडीवर दहा वर्षात केलेल्या खर्चाचा ताळेबंद सादर करण्याची मागणी
पारसिक हिल, बेलापूर टेकडी हि बेलापूर स्थित नागरिकांसाठी नैसर्गिक फुफ्फुसे असल्याने त्यावरील वृक्ष संपत्तीचे जतन -संवर्धन करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे हि पालिका आणि सिडकोची सामूहिक जबाबदारी आहे . सिडकोने गेल्या १० वर्षात लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्ष प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत याचा व वसुंधरा अभियानात नंबर मिळवण्याचा डंका पिटणाऱ्या पालिकेने वृक्ष लागवडीवर, जतन-संवर्धनावर मागील १० वर्षात केलेल्या खर्चाचा ताळेबंद जाहीर करावा. पालिकेच्या उद्यान विभागाने १० वर्षाच्या खर्चावरील श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी सजग नागरिक मंच नवी मुंबईचे संघटक सुधीर दाणी यांनी केली आहे.