15 फेब्रुवारी रोजी माझे पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत
नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 15 फेब्रुवारी 2025 रोजी रायगड इस्टेट, फेज 1, भूखंड क्र.1, सेक्टर-28, तळोजा पंचानंद, पनवेल येथे सकाळी 11 वाजता पार पडणार असून सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.
सिडकोतर्फे 12 ऑक्टोबर 2024 रोजी “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता 26,000 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य होते. अर्जदारांना आपल्या पसंतीच्या 15 सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
“माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. तसेच सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर देखील करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. सोडतीमधील यशस्वी उमेदवारांची यादी lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.