महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर परिणाम

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेत आकृतीबंधानुसार मंजूर असलेल्या पदांच्या संख्येपैकी कार्यरत असलेल्या पदाइतकीच रिक्त पदांची संख्या असल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर होत आहे. शिवाय कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर देखील अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे.

महापालिकेत वर्ग१ ते ४ अशा संवर्गाची आकृतीबंधानुसार २५७० मंजूर पदे आहेत. त्यातील १२३४ पदे कार्यरत असून १३३६ पदे रिक्त आहेत. वर्ग-१ मधील रिक्त पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग प्रसुती तज्ञ, वर्ग-२ मध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, वर्ग-३ मध्ये कनिष्ठ अभियंता, लिपीक, वाहन चालक तर वर्ग-४ मध्ये मजूर, रखवालदार अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे.

कार्यरत पदांवरील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने तर काहीजण सेवानिवृत्त झाल्यामुळे तसेच काही जणांचे निधन झाल्याने रिक्त पदात वेळोवेळी वाढ होत गेली. तसेच मिरा-भाईंदर शहर सुध्दा वेगाने वाढत गेले. त्यामुळे महापालिकेच्या कामात सुध्दा प्रचंड वाढ झाली. परिणामी, रिक्त पदांची उणीव प्रकर्षाने भासू लागली. तसेच त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामावर होत असल्याने कार्यरत पदावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून नवीन आकृतीबंध मंजूर करण्याच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. त्यालाही अनेक महिने उलटले तरी प्रशासनाकडून अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. संवर्गाची पदे मंजूर नसल्यामुळे अनेक महापालिका कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित सुध्दा राहिले आहेत.

आकृतीबंधाचा अहवाल तयार करण्यात आला असून, तो चर्चा करुन लवकरच राज्य सरकारला सादर करण्यात येईल.
-कल्पिता पिंपळे, उपायुक्त-मिरा भाईंदर महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी सेक्टर-१० येथील ‘बस स्टॉप'चे लोकार्पण