‘एनएमएमटी'तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन स्मार्टकार्ड योजना
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या २९ व्या वर्धापन दिनी एनएमएमटी बसेस मधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ऑनलाईन स्मार्ट कार्ड योजना सुरु करण्यात आल्याचे महापालिका आयुवत डॉ.कैलास शिंदे, यांनी जाहीर केले. यापूर्वी एनएमएमटी मोफत बस प्रवासासाठी लागणारे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी नजिकच्या पास सेंटर किंवा तुर्भे आगारात जावून कागदपत्रांची पुर्तता करावी लागत होती.
परंतु, आता परिवहन उपक्रमाने नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा लाभ अधिक सुलभ आणि सोपा करण्यासाठी कार्यान्विात असलेल्या एनएमएमटी बस ट्रॅकर ॲपवर सदर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास पाससाठी अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी एनएमएमटी पास केंद्रात जाण्याची गरज नाही, असे परिवहन उपक्रमातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मोफत प्रवासाकरिता ऑनलाईन योजनेचा लाभ नवी मुंबईतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घेण्याबाबत परिवहन प्रशासनामार्फत व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी आवाहन केले आहे.
प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक प्रक्रियाः
NMMT Bus Tracker App वर ऑनलाईन अर्ज भरा.
त्यावर नमूद आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
ऑनलाईन स्मार्ट कार्डसाठी लागणाऱ्या ५० रुपये शुल्काचा भरणा केल्यानंतर सदर स्मार्ट कार्ड पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल.