‘नमुंमपा'ला मनुष्यबळ पुरविणारी एजन्सी काळ्या यादीत
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेला मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या विशाल एक्सपर्ट सर्विसेस प्रा.लि. या खासगी कंपनीने कंत्राटी वाहनचालकांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम पीएफ कार्यालयात न भरता सदर वाहन चालकांची पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या कंपनीचा काळ्या यादीत समावेश केला आहे. दरम्यान, विशाल एक्सपर्ट सर्विसेसने ‘सिडको'मध्ये सुध्दा अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांच्या ‘भविष्य निर्वाह निधी'चा गैरवापर केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यानुसार ‘सिडको'ने सुध्दा संबंधित कंपनीची चौकशी सुरु केली आहे.
विशाल एक्सपर्टच्या माध्यमातून महापालिकेला कंत्राटी चालकांचा पुरवठा केला जातो. सध्या या एजन्सीद्वारे ३५ रुग्णवाहिका चालक कंत्राटी स्वरुपात महापालिकेत काम करीत आहेत. ४ वर्षापासून कार्यरत असलेल्या या एजन्सीबाबत कर्मचाऱ्यांच्या सातत्याने तक्रारी आहेत. विशेषतः पगाराच्या बाबतीत तर सुरुवातीपासून तक्रारी आहेत. यातच मागील दीड वर्षापासून या कर्मचाऱ्यांचा ‘पीएफ'च भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते ॲड. उमेश हातेकर यांनी १९ डिसेंबर २०२४ रोजी उपोषण केले होते. तसेच संबधित एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागाने या एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावून ‘भविष्य निर्वाह निधी'ची रक्कम भरल्याच्या पावत्या सादर करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, या एजन्सीने महापालिकेला गेले वर्षभर कामाचे बिलच सादर केलेले नाही. मात्र, विशाल एक्सपर्टकडून कोणताही प्रतिसाद दिला न गेल्याने महापालिका प्रशासनाने निविदेतील अटी-शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवत या एजन्सीला काळ्या यादीत टाकले आहे.
त्याचप्रमाणे निविदेमध्ये भरलेली अनामत सुरक्षा रक्कम जप्त करुन पुढील २ वर्षे या कंपनीला महापालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
काही महिन्यापूर्वी विशाल एवसपर्ट कंपनीने ‘सिडको'तील कर्मचाऱ्यांंचा पीएफ भरला नसल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाने या कंपनीच्या मागे बिल सादर करण्यासोबतच कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला की नाही? त्याबाबतची कागदपत्रे सादर करण्यास तगादा लावला होता. मात्र, विशाल एक्सपर्टकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही.
महापालिकेने विशाल एक्सपर्ट सर्विसेसला काळ्या यादीत टाकल्याने ३५ रुग्णवाहिका चालकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. महापालिकेने नवीन संस्थेची नियुक्ती करुन सदर कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे. तोपर्यंत उपलब्ध विभागात त्यांना चालक म्हणून हंगामी स्वरुपात त्यांची वर्णी लावावी.
-ॲड. उमेश हातेकर, सामाजिक कार्यकर्ते.