उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकामे तेजीत
आयुक्त आव्हाळे यांना शहरवासियांची विनंती
उल्हासनगर : उच्च न्यायालयाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करुन नवीन अनधिकृत बांधकामे निर्माण होणार करु नये, असे आदेश उल्हासनगर महापालिकेला दिलेले आहेत. तरी देखील शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत.
उल्हासनगर महापालिका आयुक्त पदाचा मनीषा आव्हाळे यांनी नुकताच पदभार सांभाळला असून त्यांनी शहरातील स्वच्छता, विकास कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई, कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात चांगले निर्णय घेतले आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नांकडे त्यांनी अद्याप लक्ष दिले नसल्याचे दिसून येते.
गेल्या अनेक दशकांपासून शहरातील बेकायदा बांधकामांमुळे बिल्डर, कंत्राटदार, वास्तुविशारद आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांसह त्यांना पाठबळ देणारे राजकारणी यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे. उच्च न्यायालयाने शहरातील ८५५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांना दंड आकारणी करून नियमित करण्याचे अध्यादेश जारी केले होते. मात्र, त्याचा फटका शहराला सहन करावा लागत आहे.
अनधिकृत बांधकामे करणारे भूमाफिया रहिवासी आणि व्यावसायिक बांधकामे करतात आणि ती मालमत्ता विकतात. अशी मालमत्ता विकत घेणाऱ्यांना दुप्पट कर भरावा लागतो. पण, मालमत्ताधारकांची सदर दुकाने आणि घरे कधीच कायदेशीर होत नाहीत, ना उल्हासनगर महापालिका ना बँक त्यांना कर्ज देते. या बांधकामांकडे कोणत्याही प्रकारची खरी किंवा वैध कागदपत्रे नाहीत, ज्याद्वारे त्यांची शासनाकडे नोंदणी करता येईल.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाने विशेष अध्यादेश जारी करुन या आदेशानंतर शहरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले असले तरी, असे आदेश देऊनही महापालिकेचे अधिकारी या आदेशांचे पालन करता दिसत नाहीत. त्यामुळे आज शहरात शेकडो टीजी आणि आरसीसी बेकायदेशीरपणे बांधले जात आहेत.
दुसरीकडे आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर प्रथम मुख्यालयात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आता शहर विकासाला गती मिळेल, अशी आशा शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, शहरातील भूमाफियांकडून अनधिकृत बांधकामे आणि पुनर्विकासाच्या नावाखाली सुरु असलेली फसवणूक आयुक्तांनी थांबवावी, अशी मागणी शहरातील सुजाण नागरिक करु लागले आहेत.
शहरात अनधिकृतरित्या बांधलेल्या सर्व लोड बेअरींग (टीजी) बांधकामांच्या तांत्रिक दृष्टीने धोकादायक आहेत. अशी बांधकामे कोसळल्याच्या अनेक दुर्घटना शहरात घडलेल्या असून त्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे. तर काही घटनांमध्ये जीवितहानी देखील झालेली आहे. याशिवाय शहरात अनेक आरसीसी बेकायदा बांधकामे आराखडा पास न करता आणि नियम न पाळता बांधली जात आहेत. या बांधकामांवरही कारवाई होईल, अशी आशा शहरवासियांना आहे.