दिल्लीच्या राष्ट्रीय प्रदर्शनात मिरा-भाईंदरच्या महिलांची वर्णी
भाईंदर : मिरा-भाईंदर मधील २ महिला बचत गटांना राष्ट्रपती भवनातील प्रदर्शनात आपली उत्पादने सादर करण्याची संधी मिळाली आहे. ‘केंद्रीय गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालय'च्या उद्योगिनी योजना अंतर्गत त्यांची निवड करण्यात आली आहे. सदर प्रदर्शन १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यापक संधी देण्यासाठी ‘केंद्रीय गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालय'ने उद्योगिनी योजना अंतर्गत संपूर्ण देशभरातून महिला बचत गटांकडील उत्पादनांची माहिती मागवली होती. मिरा-भाईंदर मधील महिला बचत गटांनी ३०० पेक्षा अधिक उत्पादनांची या योजनेंतर्गत नोंदणी केली होती. त्यापैकी श्री महालक्ष्मी महिला बचत गट आणि ब्राईट रेस या २ बचत गटांची राष्ट्रीय स्तरावरील या प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात सुरु असलेल्या प्रदर्शनात सदर बचत गटातील महिलांना आपली उत्पादने सादर केली आहेत.
‘श्री महालक्ष्मी महिला बचत गट'मार्फत इमिटेशन ज्वेलरी बनविण्यात येते. त्यांच्या दागिन्यांमधील वेगळेपण आणि गुणवत्तेमुळे त्यांच्या उत्पादनांची राष्ट्रीय प्रदर्शनात निवड झाली आहे. तर ‘ब्राईट रेस महिला बचत गट'द्वारे करण्यात येणाऱ्या वारली चित्रांची निवडही प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या या २ महिला बचत गटांना प्रदर्शनात सहभागी होण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर शहरात १,२०० महिला बचत गट कार्यरत आहेत. महापालिकेच्या वतीनेी महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी या बचत गटांना विशेष सहकार्य करण्यात येत आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून स्थानिक महिला उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली असून, याचा उपयोग महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
-संजय काटकर, आयुवत-मिरा भाईंदर महापालिका.