रात्र अंधारात, सकाळही विजेविना

बदलापूर : एकीकडे उकाडा वाढू लागला असतानाच ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीत होऊन बदलापूरकर नागरिकांना सुमारे ७ तास अंधारात काढावी लागली. त्यामुळे उकाड्यात रात्र आणि सकाळही  विजेविना असा अनुभव बदलापूरकरांना घ्यावा लागला.

फेब्रुवारी उजाडल्यापासून तापमानात वाढ होऊ लागली असल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊ लागले आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून अधूनमधून ‘महावितरण'चा वीजपुरवठाही खंडीत होऊ लागला आहे. ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीही कात्रप भागात अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. मोरीवली अंबरनाथ सब-स्टेशन येथे टॉवर लाईनचे काम सुरु असल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने काम पूर्ण होण्यास ४ ते ५ तास लागतील, अशी माहिती ‘महावितरणचे 'बदलापूर पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सुराडकर यांनी दिली होती. त्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास वीजपुरवठा सुरु झाला. परंतु, पुन्हा सकाळी ४.३० वाजता सुमारास वीज पुरवठा खंडीत होऊन सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सुरु झाला. मात्र, वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने असल्याने असून नसून सारखाच होता. अखेर सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत सुरु होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे रात्र अंधारात आणि सकाळही विजेविना असा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला.

संपर्क क्रमांकाला प्रतिसाद नाही...

९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्याने तो केव्हा पूर्ववत होणार याबाबत माहिती घेण्यासाठी नागरिक कात्रप भागातील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर कार्यकारी अभियंता सुराडकर यांना याबाबत कळविण्यात आल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच विविध व्हॉटस्‌ॲप ग्रुपच्या माध्यमातून काम सुरु असल्याबाबत फोटोसह माहिती देण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिल्लीच्या राष्ट्रीय प्रदर्शनात मिरा-भाईंदरच्या महिलांची वर्णी