महापालिका तर्फे डेब्रिज,एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका डेब्रिज विरोधी पथकाने (परिमंडळ-२) घणसोली येथे मोकळ्या दुर्लक्षित जागेवर डेब्रिज टाकणाऱ्या वाहनावर वाहन जप्तीची धडक कारवाई केली. सदर वाहन मालकाकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका उपआयुक्त (परिमंडळ-२) डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली डेब्रिज टाकणारे वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असून, महापालिका तर्फे डेब्रिज विरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.
महापालिका (परिमंडळ-२) प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाने कोपरखैरणे सेक्टर-६ परिसरातील व्यावसायिक दुकानांची तपासणी केली असता कन्नन इडली यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळल्याने सदर १ किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाई मध्ये सदर दुकानदाराकडून नियमानुसार ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका तर्फे स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासोबतच नवी मुंबई शहर स्वच्छतेला बाधा पोहचविणाऱ्या घटकांविरोधात कारवाई करण्यात येत असून, प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवरही भर देण्यात येत आहे, असे नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.