जॉय ऑफ गिव्हिंग व आयकेअरचे संगणक साक्षरता अभियान
पनवेल : जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्था व ‘आयकेअर फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण व अदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘संगणक साक्षरता उपक्रम' राबवण्यात येत असून त्याची सुरुवात ८ फेब्रुवारी रोजी पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातून करण्यात आली. सदर वसतिगृहात एकूण ४० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे या हेतूने जॉय व आयकेअरच्या वतीने संगणक उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी जॉयचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील व आश्रमाचे केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे उपस्थित होते. सदर संगणकांचा चांगला उपयोग मुलांना होणार असून त्यांना संगणकीय ज्ञानाचा सराव होण्यासाठी त्यांचा वापर होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जॉय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे व ‘आयकेअर'चे संचालक संतोष भोसले यांच्या सहयोगातून राबवण्यात येत असलेल्या ह्या संगणक साक्षरता उपक्रमाच्या माध्यमातून आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत संगणक पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे वैभव पाटील यांनी स्पष्ट केले. आजच्या स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान अत्यंत महत्वाचे झाले असून संगणकांच्या अभावी त्या ज्ञानापासून ग्रामीण, दुर्गम व अदिवासी भागातील मुले वंचित राहू नयेत यासाठी दोन्ही संस्थांच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. जॉय संस्थेच्या माध्यमातून आजवर ठाणे, पालघर व रायगडच्या ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अनेक उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असून आयकेअर फाउंडेशनदेखील खाजगी सामाजिक भागीदारीतून गरजू मुलांसाठी संगणकीय साहित्य व इतर मदत पोहोचवत आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रप्रमुख शिंदे यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले