ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ८ फेब्रुवारी रोजी सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे  आयोजन करण्यात आले. मोहिमेची सुरुवात कोपरी गणेश विसर्जन घाट, अष्टविनायक चौक येथे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी साफसफाई करुन केली. त्यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक तसेच ‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.

महापालिकातर्फे दैनंदिन स्वरुपात स्वच्छता केली जाते. त्याच जोडीला २ वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वंकष स्वच्छता मोहिमही राबवली जाते. ८ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले. त्यात ‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'च्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

सर्वप्रथम कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसर, कोपरी गणेश विसर्जन घाट परिसर येथे सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी बारा बंगला परिसरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. वंदना एसटी स्थानक येथेही त्यांनी स्वच्छता केली. त्याचवेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये उपायुक्त शंकर पाटोळे, दिनेश तायडे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. भंगार सामान, भंगार गाड्या काढणे याचाही या मोहिमेत समावेश होता.

मुख्य रस्ते, दुभाजक, अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेवर आजच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत भर देण्यात आला होता. सिध्देश्वर तलाव, कोळीवाडा, आनंदनगर, रायलादेवी तलाव परिसर, तानसा पाईपलाईन, कोपरी गांव, ज्ञानसाधना महाविद्यालय परिसर, कळवा पुल, चेंदणी, खोपट आणि रेल्वे स्टेशन एसटी बस स्थानक, बारा बंगला परिसर, मासुंदा तलावपाळी, लोढा स्प्लेंडोरा परिसर, रामचंद्र नगर, हाजुरी, दिवा आगासन रोड, न्यू शिवाजीनगर कळवा, मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसर, देवीरोड दत्तवाडी या भागात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे, असा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार विभागनिहाय पध्दतीने नियोजन करण्यात आले. तसेच मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जॉय ऑफ गिव्हिंग व आयकेअरचे संगणक साक्षरता अभियान