खाडीलगत डेब्रिज टाकणाऱ्या वाहनावर कारवाई
नवी मुंबई : स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या नवी मुंबई शहरात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता टाकल्या जात असलेल्या डेब्रिजमुळे नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेला बाधा पोहचत असल्याचे लक्षात घेत या बाबीकडे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार गांभीर्याने लक्ष दिले जात असून, महापालिका हद्दीत विनापरवाना डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका परिमंडळ-२ अतिक्रमणविरोधी डेब्रीज भरारी पथकाने महापालिका उपआयुक्त (परिमंडळ-२) डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली धडक कारवाई करुन ऐरोली सेक्टर-१० येथील खाडीलगत डेब्रीज टाकताना वाहन पकडून ताब्यात घेतले आहे. सदर वाहन मालकाकडून ३० हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
दरम्यान, नवी मुंबई शहरातील स्वच्छतेला बाधा पोहचविणाऱ्या घटकांविरोधात यापुढील काळात अधिक धडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.