33 मोठ्या थकबाकीदारांवर मालमत्ता अटकावणीची धडक कारवाई
नेरूळ मधील अमेय सोसायटीमधील गाळ्यांवरही होणार जप्तीची कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ताकर विभागामार्फत प्रभावी करवसूलीकडे विशेष लक्ष दिले जात असून थकबाकीदारांना आवाहन करून, नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत नोटीसीला प्रतिसाद न देणा-या 33 मोठ्या थकबाकीदारांवर मालमत्ता अटकावणीची कारवाई करण्यात आली असून 5 कोटी 12 लक्ष इतकी वसूली रक्कम महापालिकेकडे जमा झालेली आहे.
नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ताकर हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून त्यामधूनच नागरिकांना गुणात्मक सेवासुविधा पुरविल्या जातात. मालमत्ताकरापोटी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात 900 कोटी रक्कमेचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले असून आत्तापर्यंत 617 कोटी इतक्या रक्कमेची वसूली झालेली आहे.
या करवसूली प्रक्रियेत महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार 1 लाखापेक्षा अधिक रक्कमेचे थकबाकीदार असणा-या मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून अशा 8 हजार मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.
तथापि नोटीसांची मुदत संपूनही प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून त्या अंतर्गत 33 थकबाकीदारांवर मालमत्ता अटकावणीची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामधील 10 थकबाकीदारांनी 5 कोटी 12 लक्ष इतकी रक्कम जमा केलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत थकित रक्कम त्वरित भरणा करून शहराच्या विकास प्रक्रियेला हातभार लावण्याचे आवाहन प्रारंभी करण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या. आता नोटीसांना प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
त्यानुसार 6 फेब्रुवारी रोजी अमेय को-ऑप.हौ.सोसायटीमधील 1 लक्ष रक्कमेहून अधिक थकित मालमत्ताकर असणा-या 68 व्यापारी गाळ्यांची एकूण थकबाकी रक्कम रू. 5.32 कोटी इतकी असून त्याच्या वसूलीसाठी सदरचे 68 व्यापारी गाळे जप्त (सील) करण्यासाठी जप्ती अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर गाळे जप्त करूनही जर त्यांनी 5 दिवसात थकबाकीची रक्कम भरणा केली नाही तर सदर व्यापारी गाळ्यांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
यापुढील काळात थकबाकीदार सोसायट्यांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मालमत्ता जप्तीची कारवाई करूनही प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलाव करण्याची कारवाई देखील सुरू करण्यात येणार आहे.