रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा
नवी मुंबई : प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेला 50 हजार रुपये किंमतीचा टॅब संबधीत महिला प्रवाशाला परत करण्याचा प्रामाणिकपणा वाशीतील रिक्षा चालक चंद्रकांत लक्ष्मण शिखरे यांनी दाखवला आहे. वाशी पोलिसांच्या हस्ते सदरचा टॅब शुक्रवारी महिलेला परत देण्यात आला. चंद्रकांत शिखरे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
गत मंगळवारी 4 जानेवारी दुपारी प्रियंका कुमावत ही महिला प्रवासी वाशी रेल्वे स्टेशन येथून चंद्रकांत शिखरे यांच्या रिक्षातून वाशी सेक्टर-17 मध्ये गेली होती. त्यावेळी रिक्षामधून उतरताना सदर महिला आपला 50 हजार रुपये किंमतीचा टॅब रिक्षामध्ये विसरुन गेली होती. त्यानंतर शिखरे यांच्या रिक्षामध्ये बसलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या हाती सदरचा टॅब लागल्याने त्या प्रवाशाने सदरचा टॅब शिखरे यांच्याकडे दिला. त्यानंतर शिखरे यांनी टॅब विसरलेल्या महिलेची दोन दिवस वाट पाहिली.
मात्र त्यांच्यापर्यंत कुणीही न आल्याने त्यांनी शुक्रवारी सकाळी वाशी पोलीस ठाणे गाठून त्यांच्या रिक्षामध्ये राहिलेला टॅब पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यांनतर पोलिसांनी टॅबवरुन सानपाडा येथे राहणाऱया प्रियंका कुमावत यांना तत्काळ संपर्क साधुन त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनीसदर टॅब तिचाच असल्याची खातरजमा करुन तो तिला सुपूर्द केला. यावेळी सदर महिलेने रिक्षाचालक चंद्रकांत शिखरे व वाशी पोलिसांचे यांचे आभार मानले.