खारघर, कळंबोली येथील एसटीपी प्लांट पनवेल महापालिकाकडे हस्तांतरण करण्याची मागणी
खारघर : खारघर आणि कळंबोली येथील ‘सिडको'चे एसटीपी प्लांट पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्यात यावे, अशी मागणी ‘भाजपा'चे रायगड जिल्हा सचिव किर्ती नवघरे यांनी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक ॲड. नरेश ठाकूर, अमर उपाध्याय उपस्थित होते.
‘सिडको'ने खारघर ,तळोजा,कळंबोली आदि वसाहत पनवेल महापालिका कडे हस्तांतरीत केली आहे. मात्र, खारघर, तळोजा आणि कळंबोली परिसरात एसटीपी प्लांट ‘सिडको'कडे आहे. सदर भागात सांडपाणीचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. विशेषतः पावसाळ्यात आजही अनेक भागात रस्त्यावर सांडपाणी वाहत असतात. सदर समस्या दूर करण्यासाठी महापालिकेला सामोरे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने येथीलएसटीपी प्लांट ‘सिडको'ने पनवेल महापालिकाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी महापालिकेकडून ‘सिडको'कडे केली जात आहे. मात्र, ‘सिडको'कडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
‘सिडको'कडून सदर एसटीपी प्लांटवर वॉटर टर्शरी ट्रिटमेंट प्लांट उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. सिडको सदर प्लांटवर टर्शरी ट्रिटमेंट प्लांट उभारुन त्यामधून तयार होणारे पुनर्वापरित पाणी ‘एमआयडीसी'ला विकून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्याचा विचार करत आहे. पनवेल महापालिकाकडे टर्शरी ट्रिटमेंट प्लांटची देखभाल-व्यवस्थापन करण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे भविष्यात एसटीपी प्लांट पनवेल महापालिकाकडे हस्तांतरीत करावा आणि निविदा मध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी कीर्ती नवघरे यांनी केली आहे.
कळंबोली, खारघर आणि तळोजा वसाहत पनवेल महापालिका कडे असताना ‘सिडको'चेे काही अधिकारी सदर परिसर ‘सिडको'च्या मालकीचा असल्यासारखे वागत आहे. महापालिका क्षेत्रात येणाऱ्या या सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांवर स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवे मार्ग शोधले जात आहेत, ते प्रशासकीय दृष्टीने अयोग्य आणि अनुचित आहे. टर्शरी ट्रिटमेंट प्लांटची देखभाल-व्यवस्थापन करण्याची क्षमता पनवेल महापालिका कडे आहे. त्यामुळे सदर प्लांट पनवेल महापालिका कडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली आहे.
-किर्ती नवघरे, सचिव-रायगड जिल्हा, भाजपा.