स्वच्छ सर्वेक्षणः स्वच्छता अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा संपन्न
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'चे टुलकिट नुकतेच केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे मंत्री ना. मनोहरलाल खट्टर यांनी प्रकाशित केले असून त्यानुसार स्वच्छताविषयक कामांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा स्वच्छता अधिकारी-कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा वाशी येथील महात्मा जोतिबा फुले भवनात उत्साहात संपन्न झाला.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या देशातील मोठ्या शहरांची सुपर स्वच्छ लीग विशेष कॅटेगरी यावर्षी निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये नवी मुंबईसह इंदौर आणि सुरत या तीन शहरांचा समावेश आहे. अशा विशेष कॅटेगरीमध्ये आपल्या नवी मुंबई शहराचा समावेश असून ती सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आपले मानांकन टिकवून ठेवण्याची जबाबदारी वाढली असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी सांगितले.
यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाप्रमाणेच सर्व विभागांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे सांगत सुनिल पवार यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण'साठी येणाऱ्या परीक्षकांच्या नजरेने आपल्या कामांची पाहणी करावी आणि एखाद्या ठिकाणी त्रुटी आढळल्यास त्या संबधितांच्या त्वरित निर्देशनास आणून देउुन दुरुस्त करुन घ्याव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले.
स्वच्छता-सुशोभिकरण सर्वांची सामुहिक जबाबदारी असून आवश्यकतेनुसार परस्परांशी समन्वय राखून तत्परतेने सुधारणा करुन घ्याव्यात. निर्मितीच्या ठिकाणी नागरिकांच्या पातळीवर कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढवावे आणि नागरिकांपर्यंत स्वच्छता कार्याविषयी जास्तीत जास्त प्रमाणात माहिती पोहोचवून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये स्वच्छ भारत मिशन मार्फत काही मानके बदलली असून परीक्षण आणि गुणांकनाच्या पध्दतीतही काही प्रमाणात बदल झालेला आहे. सदर टुलकिटची सविस्तर माहिती संबधित स्वच्छता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हावी, त्यानुसार स्वच्छता कार्याला अधिक सुनियोजितपणा यावा आणि गतीमानता प्राप्त व्हावी या करिता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ-२ उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले.
यावेळी योगेश जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ टुलकिट मधील गुणांकन पध्दती आणि त्यादृष्टीने अवलंबवयाची कार्यपध्दती याविषयी सादरीकरणाद्वारे बाबनिहाय सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी परिमंडळ-१ उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२ उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ-१ उपायुक्त डॉ. अजय गडदे, सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे, प्रबोधन मवाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी तसेच इतर स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'ला सामोरे जाताना निश्चय केला नंबर पहिला असे आपले ध्येयवाक्य साध्य करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊया आणि संकल्प पूर्ण करुया.
-सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका.