नागरी समस्यांबाबत लवकरच ऑनलाईन तक्रार प्रक्रिया
उल्हासनगरः शहरातील नागरी समस्यांबाबत ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ई मेल देखील सुरू करण्यात येत आहे. त्याद्वारे त्वरित कार्यवाही करून नागरिकांच्या तक्रारींचा मागोवा घेता येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनिषा आवळे यांनी दिली. यासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या असल्याचे आयुवत आव्हाळे म्हणाल्या.
शहराच्या विकासाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी ५ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आव्हाळे यांनी सदर माहिती दिल्याचे आयलानी यांनी सांगितले.
रस्त्यांच्या कामावर स्वतः लक्ष देत असून बांधण्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील. त्याचबरोबर कामात निष्काळजीपणा आणि कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदारांची कंत्राटे रद्द करुन नवीन कंत्राटदारांना काम दिले जाणार असल्याचा इशाराही आयुक्त आव्हाळे यांनी दिला आहे.
सदर बैठकीत विषयनिहाय विविध मुद्द्यांवर माहिती सादर केली. त्यात प्रामुख्याने अनधिकृत बांधकामांची नियमितीकरण प्रक्रिया, ऑनलाईन तक्रारींसाठी वेबसाईट सुरू करणे, शहरातील सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाला गती देणे, सीएचएम कॉलेजच्या पुलाचे काम, ‘एमएमआरडीए'द्वारे बांधण्यात येत असलेले सात रस्ते लवकरात लवकर पूर्ण करणे, १७ सेक्शन परिसरातील पाणी समस्या, श्वानांची नसबंदी प्रक्रिया, महापालिकेच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर, महापालिका कामगारांची पदोन्नती, नवीन भरती, प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करणे, पाणीपुरवठ्याची विविध कामे, महापालिकेच्या नवीन इमारतीचे व्यावसायिक पध्दतीने बांधकाम करणे, आदि विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आला असल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली.