गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहण्याची गरज - ॲड. सुधा जोशी

बदलापूर : अलिकडे गुन्हेविषयक बातम्या दाखवताना त्याचे वैभवीकरण केले जाते. मात्र, सदर बाब टाळून पुढे खटला कसा चालवला गेला, पुरावे कसे सादर केले गेले आणि गुन्हेगाराला शिक्षा किती झाली, ते माध्यमांनी दाखविल्यास गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहील, असे मत ॲड. सुधा जोशी यांनी व्यक्त केले.

प्रेस क्लब ऑफ बदलापूर तसेच आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुकनायक दिन कार्यक्रमांतर्गत ‘महिला हक्क, अधिकार-कायदे' या विषयावर ॲड. जोशी बोलत होत्या.

पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांच्यामुळे विविध विषयांवर जनजागृती होत असते. पूर्वी निरक्षर लोक वृत्तपत्रे वाचत नसत. परंतु, आता असे लोकही वृत्तवाहिन्यांवर, मोबाईलवर बातम्या पाहत असतात. त्यामुळे बातम्या या परिपूर्ण आणि शुध्द असल्या पाहिजेत. पोक्सो सारख्या कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या बातम्या प्रसारित करताना वृत्तपत्रे आणि इतर प्रसार माध्यमांनी पिडीतेचे नाव आणि घटनास्थळ याबाबत गोपनीयता बाळगणे बंधनकारक आहे. वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांनी कायद्याच्या या चौकटीत राहून काम करावे, असे आवाहन ॲड. सुधा जोशी यांनी यावेळी केले.

आपल्या देशात सर्वात चांगले कायदे आहेत. महिलांना जन्मापासूनच विविध कायद्याने संरक्षण देण्यात आले असल्याचे सांगून कोणत्याही बाबतीत अन्याय होत असल्यास महिलांनी जरुर या कायद्याचा वापर करुन न्याय मिळवावा, असे आवाहनही ॲड. जोशी यांनी केले.

ॲड. आकाश वाघोले यांनीही महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची आपल्या खास शैलीत माहिती दिली. तहसीलदार अमित पुरी यांनी ‘प्रेस वलब'च्या मुकनायक दिन उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राम पातकर, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, ‘प्रेस क्लब ऑफ बदलापूर'चे अध्यक्ष विजय पंचमुख, सचिव संजय साळुंके, कोषाध्यक्ष सागर नरेकर यांच्यासह संतोष जाधव, संकेत सबनीस, रवींद्र थोरात, सागर कदम, स्वप्नील पाटील, संजय राजगुरु, महेश मोरे, दर्शन सोनवणे, तन्मय सोहनी, तन्मय तांबे, आदि पदाधिकारी-सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंकज पाटील, गणेश गायकवाड, आयविटस्‌ लोबो, कैलास जाधव, अनिकेत सोनवणे, अरुण ठोंबरे, समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे आदिंसह अंबरनाथ तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘प्रेस वलब'चे उपाध्यक्ष प्रशांत मोरे यांनी तर आभार प्रदर्शन मोहिनी जाधव यांनी केले.

सत्यता तपासूनच सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल करा -कौस्तुभ शेजवलकर
सध्या प्रभावी माध्यम सोशल मिडीयावर अनेक  पोस्ट व्हायरल होत असतात. अनेकदा त्याचीं सत्यता न तपासता ती पोस्ट फॉरवर्ड केली जाते. मात्र, सदर पोस्ट फेक असल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे आलेली पोस्ट थेट फॉरवर्ड न करता त्याच्या सत्यतेबाबत पडताळणी करुन ती खरी आहे, याची खात्री झाल्यानंतरच फॉरवर्ड करण्याचा सल्ला माध्यम तज्ञ कौस्तुभ शेजवलकर यांनी दिला. फेक न्युज आणि फॅक्ट चेक या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी फेक न्युज म्हणजे काय? त्याची सत्यता कशी पडताळावी?, कोणकोणत्या साईटसवर जाऊन ते तपासता येऊ शकते? याबाबत मार्गदर्शन केले.  यासंदर्भातील उपस्थितांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरी समस्यांबाबत लवकरच ऑनलाईन तक्रार प्रक्रिया