पाण्याअभावी पारसिक टेकडीवरील झाडे मरणावस्थेत

वाशी : भूस्खलनाचे धोके कमी करण्यासाठी सीबीडी-बेलापूर येथील पारसिक टेकडीवर गेल्या डिसेंबरमध्ये नवी मुंबई महापालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिस्तरीय पध्दतीने म्हणजेच वेट्टीवर ग्रास, छोटी झुडपे आणि शेवगा या रोपांचे तीन लेयर मध्ये रोपण करण्यात आले होते. मात्र, पारसिक टेकडीवरील झाडांना पाणी न मिळाल्याने बहुतांशी झाडे सुकली आहेत.

पारसिक टेकडीवर त्रिस्तरीय वृक्षारोपणांतर्गत लावलेली ३-४ शेवग्याची झाडे वगळता वेळेत पाण्याची व्यवस्था न झाल्याने सर्व झाडे पूर्णतः सुकलेली आहेत. त्रिस्तरीय वृक्षारोपण केलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर गेल्या वर्षी महापालिकेने वृक्षारोपण केले होते. या झाडांना पाणी मिळण्यासाठी महापालिका द्वारे २ मोठ्या पाण्याच्या टाक्या देखील बसवण्यात आल्या होत्या. मात्र, त्रिस्तरीय वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था उपलब्ध नव्हती, अशी माहिती सजग नागरिक मंच, नवी मुंबई या संस्थाच्या सदस्यांनी दिली.

महापालिका उद्यान विभागाने पावसाळा संपल्यावर युध्दपातळीवर नवी मुंबई शहरातील विविध ठिकाणी वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ रोपे लावली. परंतु, रोपे लावल्यावर वृक्षारोपणाचा विसर पडल्याने त्यातील बरीचशी झाडे सुकून गेल्याचे आणि काही झाडे सुकून जाण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसते.

दरम्यान, ज्वेल्स ऑफ नवी मुंबई वॉकींग ट्रॅक भोवती लावण्यात आलेली अनेक झाडे देखील योग्य देखभाली अभावी सुकू लागली आहेत, अशी तक्रार वृक्षप्रेमी करीत आहेत.

सीबीडी-बेलापूर येथील पारसिक हिलवर महापालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिस्तरीय वृक्षारोपण करण्यात आले होते. या ठिकाणी झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी सदर सामाजिक संस्थेची आहे. त्रिस्तरीय वृक्षारोपण केलेल्या झाडांना पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. - दिलीप नेरकर, उपायुक्त (उद्यान विभाग) - नवी मुंबई महापालिका.

वृक्षारोपण आणि पर्यावरण याबाबत तरी नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा दृष्टिकोन अत्यंत संवेदनशील असणे अभिप्रेत आहे. दरवर्षी पारसिक हिलवर लावली जाणारी झाडे जगवण्याची प्रामाणिक ईच्छा नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाला असेल तर त्यांनी पारसिक हिलवर सर्व ठिकाणी झाडांसाठी वर्षभर पाणी देण्याची व्यवस्था निर्माण करावी. - सुधीर दाणी, प्रवर्तक - सजग नागरिक मंच, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहण्याची गरज - ॲड. सुधा जोशी