नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणुकीत डॉ. राणे पॅनेल विजयी
नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन कमिटीच्या जॉईन सेक्रेटरी व सदस्य म्हणून झालेल्या निवडणुकीत डॉ. राणे पॅनलचे जॉईंट सेक्रेटरी पदासाठी असलेले उमेदवार दिनेश कनानी व दत्तू पाटील हे निवडून आले आहेत. या निवडणुकीत माजी नगरसेवक वैभव गायकवाड व मेघनाथ भगत हे पराभूत झालेले प्रतिस्पर्धी तुल्यबळ असल्याने वनमंत्री गणेश नाईक यांचे सर्वस्व चांगलेच पणाला लागले असले तरीही या पॅनलवर त्यांचे वर्चस्व मात्र कायम राहिल्याचे पहावयास मिळाले. कमिटी सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत डॉक्टर राणे पॅनल चे चार सदस्य निवडून आले.या सदस्य निवडणुकीत माजी नगरसेवक विक्रम शिंदे यांनी बाजी मारली. मात्र डॉ.राणे पॅनलचे डॉ.कन्वरसिंग पनवर यांना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला.
काल झालेल्या निवडणुकीत डॉ.राणे पॅनल वर्चस्व दिसून आले. या पॅनलने मोठा लवाजमा मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ठेवला होता. या निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन दगाफटका होऊ नये म्हणून माजी आमदार संदीप नाईक यांनी निवडणुकीच्या दरम्यान दोन वेळा हजेरी लावली होती तर मंत्री गणेश नाईक यांचे बंधू ज्ञानेश्वर नाईक हे सकाळपासून मतदान संपेपर्यंत ठाण मांडून ते डॉ. राणे पॅनलला मतदान करण्याचे आवाहन करत होते. वनमंत्री गणेश नाईक यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने तेही या चुरशीच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते.
या निवडणुकीत जॉईंट सेक्रेटरी पदासाठी माजी नगरसेवक वैभव गायकवाड व सदस्य पदासाठी माजी नगरसेवक विक्रम उर्फ राजू शिंदे यांच्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. हे दोन्ही उमेदवार निवडून येऊ नये म्हणून डॉ. राणे पॅनल यांनी व्यूह रचना केली होती.
यात त्यांना यशही आले. मात्र सदस्य पदासाठी उभे असलेले विक्रम उर्फ राजू शिंदे यांना पराभूत करता आले नाही.
नवी मुंबई स्पोर्ट्सअसोसिएशन निवडणुकीसाठी ५७५० एकूण मतदार होते त्यापैकी १३२४मतदान झाले.फक्त २३ टक्के मतदान झाले. त्याची मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. या निवडणुकीत
जॉईंट सेक्रेटरी पदासाठी
दत्तू पाटील - ८५३
दिनेश कनानी - ७००
सदस्य पदासाठी
एडवोकेट निलेश भोजने - १०१६
राजेंद्र पानसरे - ९२०
अशोक पाटील - ९०४
विक्रम शिंदे. - ७४५
प्रकाश श्रीनिवासन - ७१६ अशी मते मिळाली.