नमुंमपा क्षेत्रात ५८२ पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन
नवी मुंबई ः उच्च न्यायालयाच्या ३० जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशानुसार राज्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तींची विक्री करण्यास बंदी असून त्या पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक तलावांमधील विसर्जनासाठी बंदी आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रात माघी गणेशात्सवातील श्री मूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी २६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली होती. त्यानुसार महापालिका क्षेत्रात गणेशभवतांनी एकूण १२७५ श्रीमूर्तींचे विसर्जन केले. त्यामध्ये कृत्रिम विसर्जन तलावात ५८२ ‘पीओपी'च्या श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे ६९३ शाडू मातीच्या श्रीमूर्तींपैकी ३४ श्रीमूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करण्यात आले. ६५९ शाडू मातीच्या श्रीमूर्ती महापालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन तलावात विसर्जित करण्यात आल्या. यामध्ये कृत्रिम विसर्जन तलावात बेलापूर विभागात १२० पीओपी मूर्ती, नेरुळ विभागात ४१, वाशी विभागात ११४, तुर्भे विभागात ११८, कोपरखैरणे विभागात ७, घणसोली विभागात ९७, ऐरोली विभागात ७८ आणि दिघा विभागात ७ अशा प्रकारे ८ विभागांत २६ कृत्रिम विसर्जन तलावांवर ५८२ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली दोन्ही परिमंडळात उपायुक्त सोमनाथ पोटरे आणि डॉ. कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून सर्व आठही विभागांच्या विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत सर्वच नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली महापालिका क्षेत्रात २६ ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळे निर्माण करण्यात आली होती. विसर्जन स्थळावरील ओले आणि सुके निर्माल्य लगेच उचलून नेण्यासाठी निर्माल्य वाहतूक वाहने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अयज गडदे आणि संतोष वारुळे यांच्या नियंत्रणाखाली सज्ज होती. ‘पीओपी'च्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याच्या अंमलबजावणीसाठी परिमंडळ उपआयुक्तांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त आणि त्यांची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
नवी मुंबई महापालिकेने विसर्जनस्थळी केलेल्या चोख व्यवस्थेमुळे माघी गणेशोत्सव गणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुनियोजित पध्दतीने निर्विघ्नंपणे पार पडला.