१ लाख वीज ग्राहकांची पेपरलेस वीजबिलास पसंती
‘महावितरण'चा पर्यावरणस्नेही उपक्रम
डोंबिवली : ‘महावितरण'च्या कल्याण आणि भांडुप परिमंडलातील पर्यावरणस्नेही १ लाखांहून अधिक वीज ग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे. ‘महावितरण'च्या गो-ग्रीन उपक्रमात सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक जवळपास सव्वा कोटी रुपयांचा थेट फायदा होत आहे.
‘महावितरण'च्या गो-ग्रीन उपक्रमानुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल आणि ‘एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल आणि प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत कल्याण परिमंडलातील ५२,१२९ तर भांडुप परिमंडलातील ४९,८५६ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ई-मेल आणि ‘एसएमएस'चा पर्याय निवडला आहे. दोन्ही परिमंडलातील एकूण १,०१,९८५ वीजग्राहक या उपक्रमात सहभाग घेऊन वर्षाला १२० रुपयांप्रमाणे १ कोटी २२ लाख ३८ हजार २०० रुपये वाचवत आहेत.
आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्रो-ग्रीन उपक्रम पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल ॲप आणि वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू आणि मागील वीजबिल तसेच वीजबिल भरल्याच्या पावत्या आदिंची माहिती उपलब्ध आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ग्रो-ग्रीन उपक्रमात सहभागी ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस'द्वारेही वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाईन पध्दतीने लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांनी ग्रो-ग्रीन उपक्रमात सहभागी होऊन आर्थिक बचत करण्याबरोबरच निसर्ग संवर्धनास हातभार लावण्याचे आवाहन ‘महावितरण'ने केले आहे.
ग्रो-ग्रीन उपक्रमात सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉपट कॉपीमध्ये जतन करुन ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. गरजेनुसार वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरुपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. वीजग्राहकांना ग्रो-ग्रीन उपक्रमाचा पर्याय निवडण्यासाठी ‘महावितरण'चे मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.
नवीन वर्षाची भेट, एकरकमी मिळवा सूट...
दरम्यान, नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा ‘महावितरण'ने केली आहे. यापूर्वी या योजने अंतर्गत ग्राहकांना मासिक वीजबिलात १० रुपये सूट देण्यात येते. मात्र, आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील १२ महिन्यासाठी तत्काळ १२० रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे. ‘महावितरण'ने गो ग्रीन ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वाशी मंडल आघाडीवर...
दोन्ही परिमंडलात ‘गो-ग्रीन'च्या नोंदणीत वाशी मंडलाने आघाडी घेतली आहे. वाशी मंडलातील २२४३६, ठाणे शहर मंडलातील १८७९८, कल्याण-१ मंडलातील १८५७२, वसई मंडलातील १४६१९, कल्याण-२ मंडलातील १३६५२, पेण मंडलातील ८६२२ आणि पालघर मंडलातील ५२८६ वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन'मध्ये नोंदणी करुन छापील बिलांना अलविदा केला आहे.