एपीएमसी फळ बाजारात हापूस आंबा आवक मध्ये वाढ
वाशी : मागील आठवड्यात वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याच्या २४ पेट्यांची आवक झाली होती. तर आता हापूस आंबा आवक मध्ये अधिक वाढ होऊन तब्बल १७५ पेटी हापूस आंबा विक्रीसाठी एपीएमसी फळ बाजारात दाखल झाला असून, चार ते सहा डझन हापूस आंबा पेटीला ७ ते १२ हजार रुपये दर मिळाला आहे. मार्च आधीच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंबा आवक वाढण्यास सुरुवात झाल्याने व्यापारी समाधान व्यक्त करीत आहेत.
कोकणातील हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी ग्राहक आसुसलेले असतात. बाजारात हापूस आंब्याचा मुख्य हंगाम मार्च महिन्यामध्ये सुरु होतो. मात्र, एपीएमसी फळ बाजारात तुरळक प्रमाणात हंगाम पूर्व हापूस आंबा जानेवारी, फेब्रुवारी मध्ये दाखल होतो. यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरीस एपीएमसी फळ बाजारात २४ पेट्या हापूस आंबा दाखल झाल्यानंतर १ फेब्रुवारा रोजी १७५ पेट्या हापूस आंबा आवक झाली आहे.मागील आठवड्यात हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्यानंतर १० ते १५ हजार रुपये दराने हापूस आंबा पेटीची विक्री झाली होती. परंतु, १ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या एका पेटीतील ४ ते ६ डझन हापूस आंब्याची ७ हजार ते १२ हजार रुपये बाजारभावाने विक्री झाली आहे. यंदा हवामान बदल, कडाक्याची थंडी यामुळे सुरुवातीचा हापूस आंबा मोहोरला फळधारणा झाली नाही तर काही मोहोर गळून पडला. थ्रीप्स रोगाच्या प्रादुर्भावाचाही फटका हापूस आंबा उत्पादनाला बसला. परिणामी औषधी फवारणी खर्च वाढला. त्यामुळे खवय्यांना हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी १५ मार्च २०२५ पर्यंत वाट पहावी लागणार असून, हापूस आंबा दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
१ फेब्रुवारी रोजी एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या १७५ पेट्या दाखल झाल्या असून, यंदाच्या हंगामातील आत्तापर्यंतची अधिक हापूस आंबा आवक झाली आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा एपीएमसी फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. सध्या बाजारात ४ ते ६ डझनाच्या हापूस आंबा पेटीची ७ ते १२ हजार रुपये दराने विक्री होत आहे. - संजय पानसरे, संचालक - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी).