यांत्रिक सफाई यंत्रे धुळखात; २.४० कोटींचा निधी कचऱ्यात
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने २ कोटी ४० लाख रुपये खर्च करुन खरेदी केलेली १२ कचरा साफ करणारी यांत्रिक सफाई यंत्रे बंद अवस्थेत प्रभाग कार्यालयाच्या आवारात अडगळीत टाकल्यामुळे यांत्रिक सफाई करणारी यंत्रेच कचऱ्यात गेल्याचे दृश्य दिसून येत आहे.
शहरातील कचरा जलद गतीने साफ करण्याच्या उद्देशाने मिरा-भाईंदर महापालिकेने मोठा गाजावाजा करत २ वर्षांपूर्वी यांत्रिक सफाई करणारी १२ यंत्रे २ कोटी ४० लाख रुपयांना खरेदी केली. तत्कालीन आमदार गीता जैन यांच्या निधीची सुध्दा वापर करण्यात आला होता. महापालिकेच्या ६ प्रभागात प्रत्येकी २ अशी विभागणी करण्यात आली. सदर यंत्रे वापरण्याचे प्रशिक्षण सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, ती यंत्रे वापरण्यातच आली नाहीत. कालांतराने योजनाच कचऱ्यात टाकण्यात आली. महापालिकेच्या ६ मधील एकाही प्रभागात याचा योग्य वापर केला गेला नाही. नंतर सदर यंत्रे प्रभाग कार्यालयाच्या आवारात अडगळीत उभी करण्यात आली आहेत. आता तर ती धूळ खाऊन तसेच गंजून गेल्यामुळे नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे करदात्या नागरिकांचा पैसा सुविधा न मिळताच कचऱ्यात गेला.
सफाई यंत्रांचा वार्षिक देखभाल करार (एएमसी) पूर्ण झाला आहे. लवकरच त्याचे नुतनीकरण करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा रस्त्यांची यांत्रिक सफाई करणारी यंत्रे कार्यान्वित होतील.
-डॉ. सचिन बांगर, उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका.