टीएस चाणक्य सागरी किनाऱ्यावर लोकसहभागातून विशेष स्वच्छता

नवी मुंबई : २ फेब्रुवारी रोजीच्या ‘जागतिक पाणथळ दिवस'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका, इन्व्हायर्नमेंट लाईफ (मँग्रुव्हज सोल्जर) आणि सेव्ह नवी मुंबई या दोन पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने बेलापूर विभागात टी. एस. चाणक्य पाठीमागील सागरी किनारा येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून जागतिक पाणथळ दिनाचे औचित्य साधून सदर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे, कार्यकारी अभियंता राजेश पवार, स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता निरीक्षक विजय नाईक यांच्यासह ‘इन्व्हायर्नमेंट लाईफ'चे प्रमुख धर्मेश बराई, ‘सेव्ह नवी मुंबई'चे प्रमुख सुनील अग्रवाल, श्रुती अग्रवाल, डी. के. जैन, राहुल रासकर, ‘नील सिध्दी ग्रुप'चे प्रमुख कल्पेश पालन आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नवी मुंबई महापालिका आयोजित करीत असलेल्या स्वच्छता मोहिमांना युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत आहे. २ फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहिमेत एसआयईएस महाविद्यालय नेरुळ, एससीओई महाविद्यालय खारघर आणि केबीपी महाविद्यालय आणि डीएलएलई गटाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता.

या विशेष मोहिमेअंतर्गत पाणथळ जागांमधून १०० हून अधिक गोणी कचरा काढून टाकण्यात आला. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, एकल वापर प्लास्टिकचे प्रमाण अधिक होते. सदर मोहिमेद्वारे पाणथळ जागांच्या स्वच्छतेच्या माध्यमातून स्थानिक पर्यावरणाचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले. मोहीम यशस्वीरित्या आणि योग्य पध्दतीने राबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत आयोजित या विशेष स्वच्छता मोहिमेत १०० हून अधिक पर्यावरण प्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला. सीवुडस्‌ येथील श्री बामनदेव अंडरपासजवळील मैदानावर सर्वांनी एकत्र येऊन प्लास्टिक बंदी आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सामुहिक शपथ घेतली. यावेळी कापडी पिशव्यांंचे वाटप करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यांत्रिक सफाई यंत्रे धुळखात; २.४० कोटींचा निधी कचऱ्यात